प्रशासनाकडून कारवाई, रेती परत पाण्यात टाकली
प्रतिनिधी / सांगे
साळावली धरणाच्या जलाशयात कुर्पे येथे ग्रीन लँड म्हणून ओळखल्या जाणाऱया ठिकाणी बेकायदा वाळू उपसा करण्यात येत असल्याचे कळल्यानंतर सांगेतील प्रशासनाने त्याची दखल घेऊन नुकतीच आवश्यक कारवाई केली. धरणाच्या जलाशयात वाळू उपसा करण्यास बंदी आहे. असे असले, तरी वरील ठिकाणी रेती उपसा करून ठेवण्यात आली होती.
याची तक्रार सांगे येथील मामलेदार कार्यालयाला मिळताच संयुक्त मामलेदार ऍना रिटा पाईस यांनी घटनास्थळी धाव घेऊन वर काढून ठेवण्यात आलेली रेती जेसीबी यंत्राच्या साहाय्याने पुन्हा पाण्यात टाकली. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असून काही लोक त्याचा अशा प्रकारे फायदा घेण्यास मागे-पुढे पाहत नाहीत, असे यावेळी सांगण्यात आले. या कारवाईच्या वेळी तलाठी श्याम वाडकर हेही हजर होते. जलस्रोत खात्याने अशा गोष्टींवर नजर ठेवणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत आहे. कारण सदर जागा त्यांच्याच अखत्यारित येते.









