कदंब बसचालक-वाहक, प्रवाशांवर रस्ता मोकळा करण्याचा प्रसंग
प्रतिनिधी / सांगे
गेले काही दिवस सतत पडणाऱया पावसामुळे नेत्रावली ग्रामपंचायत क्षेत्रातील डोंगराळ भागातील साळजिणी येथील रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडून शुक्रवारी सकाळी साळजिणी ते कुडचडे मार्गावर वाहतूक करणाऱया कदंब बसचे चालक, वाहक व प्रवाशांना स्वतः रस्ता मोकळा करून पुढे जावे लागले.
उपलब्ध वृत्तानुसार, गुरुवारी रात्री ही दरड कोसळली. या दिवसांत सतत पडणाऱया पावसामुळे डोंगराची माती मऊ झाल्याने पाण्याचा प्रवाहावरोबर कोसळून ती खाली रस्त्यावर आली. साळजिणी भागात सर्वाधिक पाऊस पडत असतो. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी वाहून येत असून छोटे धबधबे पाहायला मिळतात. साळजिणीपासून सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर ही दरड कोसळली होती.
वेर्ले – साळजिणी रस्त्याची स्थिती बिकट
गेल्या वषी देखील या रस्त्यावर दरड कोसळली होती. दरड कोसळलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर पुढे एक बोगदा लागतो. या बोगद्याचे गेल्या वर्षी रूंदीकरण करण्यात आले होते. मात्र अजून हे काम व्यवस्थितरीत्या झालेले नाही. मुळात वेर्ले ते साळजिणी रस्त्याची स्थिती बिकट असून रस्त्यावरील डांबर वाहून गेला आहे. तसेच लहान-मोठे खड्डे पडलेले आहेत. पूर्वी ज्या कंत्राटदाराने रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण करण्याचे काम घेतले होते तो सदर काम अर्धवट ठेवून पसार झाला होता. मधल्या काळात येथील लोकांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर यांनी लोकांशी संवाद साधत दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांना सांगे येथे बोलावून त्यावर यशस्वी तोडगा काढला होता. त्यानुसार या रस्त्याचे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्याचे ठरले होते. परंतु कोरोनाने डोके वर काढल्याने पुढे काहीच होऊ शकले नाही. ना धड वीज, ना मोबाईलला रेंज अशी येथील नागरिकांची अवस्था आहे. त्यातच रस्त्याची बिकट स्थिती झाली असून उपलब्ध असलेली एकमेव कदंब बस सुद्धा कशीबशी या रस्त्यावरून धावत आहे. या रस्त्याच्या मधून काही ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाते. तेथे पाईप टाकून पाण्याला वाट करून देण्याचे काम तसेच तेथील रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही.









