कुडाळ / वार्ताहर:
जोराच्या पावसासह मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आलेल्या प्रचंड चक्री वादळाचा साळगाव – वेशीवाडी व बाजार वाडी येथे तडाखा बसला. तेथील सुविधा केंद्राच्या इमारतीचे ६० पत्रे उडून आतील साहित्य भिजून मोठे नुकसान झाले. या वादळाने माणगाव – ढोलकरवाडी परिसरातील दोन मांगराचे नुकसान झाले. या वादळाचा वेग एवढा जबरदस्त होता की पत्रे साधारण ८० ते १०० मिटर अंतरावर फेकले गेले. जवळपास दहा मिनिटे या वादळाचा थरार नजीकच्या काही ग्रामस्थानी अनुभवला. काल रात्री माणगाव खोऱ्यासह कुडाळ तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत होता. या पावसाचा जोर असतानाच मध्यरात्री एक ते सव्वाएक वाजण्याच्या सुमारास साळगाव – वेशिवाडी व बाजारवाडी तसेच माणगाव – ढोलकरवाडी परिसरात चक्री वादळ झाले. या वादळात साळगाव – वेशी वाडी ( ग्रामपंचायत नजीक ) येथील विलास महादेव सावंत यांच्या दुकान गाळा, इमारतीच्या पाचही गाळ्याचे नुकसान झाले. साळगाव – बाजारवाडी येथील तरुण भारत वृत्तपत्र विक्रेते गोविंद ( महादेव ) काशिराम धुरी यांच्या घर वजा दुकान इमारतीची कौले व अंगणातील मंडपाचे पत्रे उडून फुटले. तसेच आतील अन्न धान्य व साहित्य मिळून मोठे नुकसान झाले. बाजारवाडी येथील कृष्णा उमळकर यांच्या घराच्या मागील पडवीवर फोपळीचे झाड पडून, तर तेथील किसन उमळकर यांच्या घराचे नुकसान झाले. साळगाव प्रभारी तलाठी व्ही. एस. शेणवी यांनी नुकसानीचा पंचनामा केला. जि. प. माजी अध्यक्ष दिनेश साळगावकर ,सरपंच उमेश धुरी ,उपसरपंच अमित दळवी व ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली . . या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही