पर्यावरण बिघडवणाऱ्यांच्यावर कारवाईची मागणी
प्रतिनिधी / सातारा
महागड्या गाड्या चिखलातून डोंगरदऱ्यातून चालवून आपली मर्दमुखी दाखवणाऱ्या श्रीमतांची राईड स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सालादेवी पठारावर पार पडली. यामुळे आधीच अतिवृष्टीने घाईला आलेल्या शेतकरी या राईडमुळे वैतागला असून याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अशा राईडकडून पर्यावरणाची हाणी होत असून कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
अतिवृष्टीने जिह्याची अपरिमित हानी झाली आहे. अजूनही काही भागात मदत पोहचली नाही. असे असताना काही श्रीमंत मंडळी आपल्या अलिशान गाडय़ा चिखलातून रानावनातून उधळून आपण कसे डॅशिंग ड्राईव्ह करतो हे दाखवून देत गवताची, माळ रानाची नासाडी करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सालादेवी पठारावर ही राईड झाली. या राईडला कोणी परवानगी दिली ?, त्या परवानगी देणाऱ्याची आणि ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्या वाहनांची परवाने रद्द करावेत, अशी मागणी पठार भागातील शेतकऱयांमधून होत आहे. पुन्हा अशा राईड आल्या तर आम्ही त्यांना फिरकू देणार नाही, असाही इशारा दिला आहे.









