विनापरवाना रस्ता खोदाई : पाणीपुरवठा मंडळ अभियंत्याला नोटीस
वार्ताहर /अगसगे
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विनापरवानगीने अगसगे-बेळगाव, अगसगे-बेकिनकेरे या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पाईपलाईन घालण्यासाठी खड्डे खोदाई केल्याबद्दल ‘तरुण भारत’मधून दि. 22 जुलै रोजी रस्ता खोदाई संदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. सार्वजनिक बांधकाम खात्याने याची दखल घेऊन ग्रामीण विभाग पाणीपुरवठा मंडळ, साहाय्यक अभियंता बेळगाव यांना नोटीस बजावली आहे.
गावामध्ये सुस्थितीत असलेले रस्ते तसेच अगसगे-बेळगाव, अगसगे-बेकिनकेरे या मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी न घेता ग्राम पंचायतीने व कंत्राटदाराने कायद्याचे उल्लंघन करून रस्ता खोदाई केली होती. यामुळे जागोजागी रस्ता खराब झाला आहे. खोदाई केलेल्या खड्डय़ांमध्ये माती टाकून खड्डे बुजवले आहेत. यामुळे या ठिकाणी वाहने नादुरुस्त होत आहेत व लहानसहान अपघातदेखील घडत आहेत. याबाबत ‘तरुण भारत’मध्ये दि. 22 जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम खाते खडबडून जागे झाले. त्वरित गावाला भेट देऊन खोदाई केलेल्या रस्त्यांची पाहणी केली.
संबंधित ग्रामीण विभाग पाणीपुरवठा मंडळ, साहाय्यक अभियंता बेळगाव यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये असे म्हटले आहे, की सार्वजनिक बांधकाम खात्याच्या परवानगीशिवाय रस्ता खोदाई का केली? याचा वाहनचालकांना त्रास होत असून अपघात घडण्याची शक्मयता आहे. अपघात घडल्यास तुम्हीच जबाबदार असाल, परवानगीशिवाय रस्ता खोदाई करून नियमांचे उल्लंघन करून खड्डे काढून तसेच का सोडले? त्याची त्वरित नुकसानभरपाई भरा, आणि रस्ता सुस्थितीत बनवा. अन्यथा पुढील कारवाई करू, असे बजावले आहे. संबंधितांकडून भरपाई घेऊन रस्ता पूर्वीप्रमाणे सुस्थितीत करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता संतोष जाधव यांनी यावेळी दिली.









