श्रीराम सेनेची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीचे निमित्त पुढे करून सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी नाकारली आहे. हा आदेश त्वरित मागे घेऊन परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून सरकारने सव्वाशे वर्षांची परंपरा खंडित करू नये, अशी मागणी केली आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढय़ात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. जातपात, प्रांत, भाषाभेद विसरून सगळय़ांना एकत्र करण्यासाठी हा उत्सव सुरू झाला. आता त्यावर बंदी घालू नये.
अनेक कलाकारांसाठीही हे एक व्यासपीठ आहे. कोरोना महामारीसंबंधी भरपूर जनजागृती झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करीत उत्सव साजरा करता येणार आहे. त्यामुळे त्वरित त्यांनी आपला आदेश मागे घ्यावा. आणीबाणीच्या काळातही गणेशोत्सवाला बंदी नव्हती. बार, मॉलना परवानगी देऊन केवळ गणेशोत्सवावरच का बंदी? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. जिल्हा कार्याध्यक्ष विनय अंग्रोळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.









