गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱयांनी धरला आग्रह : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : लवकरच निर्णय देण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. मात्र सरकारने केवळ पाच दिवसच साजरा करण्यास मुभा दिली आहे. यामुळे अन्याय झाला असून कोरोनाचे सर्व नियम पाळू, मात्र आम्हाला परंपरेनुसार 10 दिवस गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शहापूर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सव महामंडळाची बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकाऱयांना सर्व गणेशोत्सव मंडळांच्यावतीने विनंती केली आहे. गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी सर्व महामंडळाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी प्रारंभी सरकारने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत दिलेल्या मार्गसूचीची माहिती दिली.
यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळू, मात्र आम्हाला 10 दिवसच गणेशोत्सव साजरा करण्यास मुभा द्या, अशी मागणी सर्वांनी केली. यावेळी नेताजी जाधव यांनी निवडणूक घेण्यास मुभा देण्यात येते. मात्र गणेशोत्सव साजरा करतानाच निर्बंध का? असा प्रश्नही उपस्थित केला. सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्ती चार फूट रहावी, पूजा करताना मंडपामध्ये केवळ पाचजण रहावेत, मंडपात येणाऱया कार्यकर्त्यांचे लसीकरण झाले पाहिजे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. मंडप घालताना वाहतुकीला त्रास होऊ नये याचीही काळजी घ्या. गणेशोत्सव काळात मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, गणेशोत्सवाच्या सर्वच मिरवणुकांवर बंदी असणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एक खिडकी योजनेद्वारे परवानगी दिली जाणार
विसर्जन करताना मोबाईल टँकचा वापर करावा. महापालिकेच्यावतीने सर्व ती तयारी केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगीची घातलेली अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र जिल्हाधिकाऱयांनी एक खिडकी योजनेद्वारे परवानगी दिली जाईल, असे सांगितले.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हय़ामध्ये प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. मात्र कार्यकर्त्यांनी किमान दहा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यास मुभा द्यावी, असा आग्रह धरला. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी याबाबत सरकारकडे पाठपुरावा करू आणि तुम्हाला लवकरच निर्णय देऊ, असे आश्वासन दिले.
या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर अशोक चिंडक, सुनील जाधव तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.









