प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण आयुष्यात एकदा तरी जग बघावे. स्वित्झर्लंड, मालदीव, अमेरिका, सिंगापूर अशा सुंदर देशांमध्ये जाऊन नव-नवीन गोष्टींचा अनुभव घ्यावा. तिथली संस्कृती, इतिहास, विविध पाककृतींचा आस्वाद घ्यावा आणि तो अनुभव लोकांपर्यंत पोचवावा. आज-कालच्या सोशल मीडियाच्या काळात, या सर्व गोष्टींचे प्रमाण अधिक वाढले आहे. परदेशातील सुंदर स्थळांची चित्रे पाहिली की आपल्यालादेखील देशाबाहेर जाण्याचा मोह होतो. पूर्वीपासून अनेक माध्यमातून आपल्याला हेच दर्शवले गेले आहे की परदेशातील नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सुंदरता भारतापेक्षा अधिक श्रे÷ आहे. पण भारत हा देश जरी अजून पूर्णपणे विकसित झाला नसला, तरी त्याकडे इतिहासाचा आणि संस्कृतीचा भरमसाठ साठा आहे. अशी कितीतरी स्थळे आहेत ज्यांना हवी तेवढी मान्यता किंवा प्रसिद्धी मिळालेली नाही. जरा जागरुकतेने पाहिले तर भारतातील या स्थळांचे वेगळेपण इतर देशातील स्थळांहून अधिक आहे.
1. मॅग्नेटिक टेकडी, लडाख
लेहजवळ असलेल्या या टेकडीचे वैशिष्टय़ काही अजबच आहे. गुरुत्वाकर्षण ही संकल्पना जगन्मान्य आहे. पण या ठिकाणी गेल्यावर असे वाटते की गुरुत्वाकर्षणासारख्या मोठय़ा शक्तीवर ही टेकडी मात करते. तिथे एका ठरावीक जागी गाडी लावली की ती गाडी चढावावर आपोआप वर चढताना दिसते. हे अद्भुत वाटत असलेतरी त्यामागे खरेतर निसर्गाचा एक विलक्षण आभास आहे. त्या जागेची रचना अशी आहे की दिसताना तो चढ वाटतो पण खरेतर तो उतारच आहे. आता हा तर्क खरा का खरंच तिकडे चुंबकीय शक्ती एवढी जास्त आहे हे माहीत नाही. पण हा अनुभव नक्कीच घ्यायला पाहिजे.
2. माजुली, आसाम
जगातील सर्वात मोठे नदी बेट भारतात आहे. ब्रह्मपुत्रा नदीजवळ असलेले माजुली हे बेट नैसर्गिक सौंदर्य आणि संस्कृतीचा साठा आहे. 325 चौ.कि.मी पसरलेल्या या बेटावर अनेक पर्यटनस्थळे आहेत. तिथे तुम्ही कमलबारी, दक्षिणपत, ऑनियती अशा ऐतिहासिक जागांना भेट देऊन तेथील पौराणिक कलाकृती, दागिने, वास्तुकला आणि भांडी बघू शकता किंवा निसर्गाच्या सान्निध्यात पक्षी निरीक्षणाचा आस्वाद घेऊ शकता. मन तृप्त करून टाकणारा निसर्गाचा भरमसाठ साठा भारताकडे भरभरून आहे हे माजुलीवरून लक्षात येते.
3. लेपाक्षी, आंध्र प्रदेश

हिंदूपुरपासून 13 कि.मी. वर अनंतपूर जिह्यामध्ये लेपाक्षी नावाचे गाव आहे. हे गाव तेथील 3 मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे जे विष्णू, शिव आणि वीरभद्र या देवतांना अर्पित केले आहे. विजयनगर काळातील अनेक गुहा, भित्तीचित्रे आणि कोरीव काम या ठिकाणी बघायला मिळते. या ठिकाणची अजून एक खास गोष्ट म्हणजे तिथे एक पदचिन्ह आहे जे साक्षात माता सीतेचे आहे असे मानले जाते. त्यातील संगीतकार आणि संतांची शिल्पे या जागेला एक पुरातत्व आणि कलात्मक वैभव प्रदान करतात. भारताच्या या अद्भुत इतिहासाचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा.
4. डमरो, अरुणाचल प्रदेश
अरुणाचल प्रदेश हे राज्य तेथील नैसर्गिक सौंदर्यासाठी जाणले जाते. पण त्याहून अधिक आकर्षक तेथील आदिवासी इतिहास आहे. अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांगच्या मारियांग ब्लॉकमध्ये वसलेले डमरो गिडूम हे आकर्षक गाव आहे. येथील यामने नदीवर ऊस आणि तारांनी बांधलेला सर्वात मोठा पूल आहे. हा पूल तब्बल 1,000 फूट लांब आहे. हा पूल तेथे स्थायिक असलेल्या आदी पदम जमातीच्या प्राचीन संस्कृतीचे प्रतीक आहे.
5. जवाई, राजस्थान
जवाई बंध हे राजस्थानमधील सुमेरपूर शहराजवळ पाली जिह्यातील जवाई नदीवर बांधलेले धरण आहे. येथील राष्ट्रीय उद्यानात बिबटय़ा, पक्षी, हायना, पांढरा कोल्हा, आळशी अस्वल, जंगलातील मांजर, नीलगाय, मगरी आणि इतर प्राणी आहेत. जवाई नदीजवळ रबारी नावाच्या जुन्या आदिवासी जमातीचादेखील वास आहे. वन्यजीव प्रेमींसाठी ही जागा अतिशय मस्त आहे. येथील बांधाची अजून एक खास गोष्ट म्हणजे हा बांध बांधायला जोधपूरचा महाराजा उमेदसिंगना 11 वर्षे लागली होती. येथील बिबटय़ांच्या सफारीमध्ये या सुंदर जंगली प्राण्याला मोकळे फिरताना पाहून व रम्य वातावरणाचा आस्वाद घेऊन कोणाचे मन प्रसन्न होणार नाही?
6. इडुक्की, केरळ
या जागेला निसर्गप्रेमींचा स्वर्ग म्हटले गेले आहे. येथील अर्ध्यापेक्षा जास्त जागा जंगलांनी झाकलेली आहे. ही टेकडी वन्यजीव अभयारण्ये, सुंदर बंगले, चहाचे कारखाने, रबराचे मळे आणि जंगले यासाठी ओळखली जाते. तेथील कुराण कुराथी धरण हे देशातील सर्वात मोठे धरण आहे. वन्यजीव अभयारण्य, कॅलवारी डोंगर, किझहरकुठू धबधबा, मंगलादेवी मंदिर अशी अनेक रम्य पर्यटनस्थळे इडुक्कीमध्ये बघायला मिळतात. या जागेची खासियत म्हणजे तेथील निसर्ग. सर्वत्र पसरलेली हिरवळ, मोकळी हवा, ताजा चहा आणि आपल्या माणसांची साथ या जागेला एक परिपूर्ण पर्यटनस्थळबनवते. भारत हा खूप मोठा देश आहे. गर्दी, गोंगाट, वाढती लोकसंख्या या सर्वांपेक्षाही अधिक या भूमीचा इतिहास, त्यातील विविधता आणि त्यावर नांदणाऱया अद्वितीय संस्कृती, जास्त प्रगल्भ आहे. या सर्व जागांना आणि इतिहासाला हवे तेवढे महत्त्व आपण भारतीय देत नाही. मोठय़ा इमारती, सुख-सोयी आणि भौतिकवादी आनंदापेक्षा जास्त आपल्याकडे अशे काही ऐतिहासिक रत्ने आहेत ज्यांना कोणत्याही परिस्थितीत हरवून चालणार नाही. खरंतर एवढा निसर्गाचा, कलेचा आणि इतिहासाचा साठा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जग प्रत्येकाने बघायलाच पाहिजे. पण त्याहून अधिक आपल्या देशामधील या अद्भुत जागांना देखील विसरून चालणार नाही. कारण सुंदरता सर्वत्र आहे, ती पारखणारी नजर फक्त पाहिजे.
-श्राव्या माधव कुलकर्णी








