प्रतिनिधी / हातकणंगले
बार्टी संस्थेप्रमाणे असणाऱ्या छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन व मानव विकास संस्थेची ( सारथी )स्वायत्तता खंडीत होऊ नये, या प्रमुख व अन्य मागण्यांचे निवेदन हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने हातकणंगलेचे तहसीलदार डॉ. प्रदीप उभाळे यांना देण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जिवंत स्मारक असणाऱ्या सारथी संस्थेचे काम पूर्ववत न झाल्यास मराठा समाजाचा उद्रेक होईल, असा इशारा देण्यात आला.
छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन व मानव विकास संस्था मराठा समाजासाठी अत्यंत सक्षमपणे सुरू होती. जानेवारीत पुणे येथे झालेल्या आंदोलनात मुख्यमंत्र्यांनी संस्थेच्या स्वायत्ततेबाबत आश्वासन दिले होते. सहा महिन्यांपासून संस्थेचे कामकाज ठप्पच आहे. तीन कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मराठा समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची होणारी गळचेपी पाहून समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत आहे, असे शिष्टमंडळातर्फे सांगण्यात आले. तसेच सारथी संस्था राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवंत स्मारक असून,त्याचे काम पूर्वीप्रमाणेच सुरू व्हावे. संस्थेत ७५ ऐवजी फक्त ९ कर्मचारी कार्यरत असून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करावे,पाच कोटी निधी परत का गेला याची चौकशी व्हावी,सहा महिन्यांत संस्थेचा व व्यवस्थापकीय संचालक यांचा चौकशी अहवाल सादर करावा,बार्टीतील समतादूतप्रमाणे सारथीतील तारादूत का नको व ही कल्पना कोणाची ते जाहीर करा, संशोधक शिष्यवृत्तीचा प्रश्न निकाली काढावा,सारथी संस्था बंद पडावी या हेतूने कार्यरत असणाऱ्यांची चौकशी व्हावी,अशा मागण्याही केल्या.
शिष्टमंडळात हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील, उपाध्यक्ष दीपक कुन्नुरे,सचिव भाऊसाहेब फास्के, खजिनदार अमित गर्जे,नगरसेवक दिनानाथ मोरे,राजेंद्र सूर्यवंशी,गजानन खोत,दिलीप खोत, सुरेश जाधव,सुरेश भगत,सतीश नरुटे,अरुण परिट,राजू जांभळे,कृष्णात जाधव,अमोल चव्हाण, तानाजी नर्मदे,अमर कदम,पंकज यादव आदींचा समावेश होता. सदर निवेदनाची प्रत हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाठवण्यात आली आहे.
Previous Articleइचलकरंजीत ७२ तासांचा लॉकडाउन
Next Article पन्हाळा तालुक्यात कोरोनाचा भार कंत्राटी कामगारांवरच








