– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास : सरकार मराठा समाजासोबत असल्याचे आश्वासन
– कोल्हापुरातील उपक्रेंदाचे ऑनलाईन उद्घाटन
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शाहूनगरीत सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरु होत आहे, ही बाब आनंददायी आहे. सारथी मराठा समाजाला दिशा दाखवणारी संस्था आहे. समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांचे हि संस्था नक्कीच आयुष घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच सरकार मराठा समाजासोबत आहे. समाजाच्या अन्य मागण्याही चर्चेतून सोडवू, असे आश्वासनही याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय परिसरात सारथी संस्थेचे उपक्रेंद सुरु करण्यात आले. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपकेंद्राचे ऑनलाईन उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. राज्य मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मराठा समाजाने आरक्षणासाठी आत्तापर्यंत संयमाने लढा दिला आहे. सरकारही नेहमीच मराठा समाजासोबत असणार आहे. आरक्षणासाठी कायद्याचे अडथळे पार करायचे आहेत. ते पाठपुराव्याने पार करु. तोपर्यंत समाजाच्या ज्या मागण्या सरकारल पूर्ण करणे शक्य आहे, त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सारथीचे उपकेंद्र सुरु करुन मराठा समाजाला न्याय देणारी हि पहिली पायरी आहे. भविष्यात चर्चेतून समाजाच्या सर्व मागण्या सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सारथी संस्थेचा विकास थांबल्याने मराठा समाजाचाही विकास थांबला होता. मात्र हे उपक्रेंद सुरु करुन सारथी संस्थेला गती देण्याचे काम सरकारने केले आहे. उपकेंद्रामुळे समाजाला मार्गदर्शन करणारे ठरणार आहे. तसेच समाजाच्या विकासालाही गती मिळणार आहे. सारथी संस्थेच्या उपकेंद्राप्रमाणेच समाजाच्या अन्य मागण्यांबाबतही सरकारने लवकर सकारात्मक विचार करावा, असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी व्यक्त केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत सुरु असलेल्या पाठपुरावाल्या सारथी उपकेंद्राच्या रुपाने यश मिळाले आहे. कोल्हापुरात सारथीचे केंद्र सुरु करुन सरकारने दिलेले शब्दा पाळला आहे. मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीही सरकारचा पाठपुरावा सुरु असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते. तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशिल माने, मुख्य सचिव सिताराम कुंटे, अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती ऑनलाईन उपस्थित होते. प्रास्ताविक सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी तर व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी आभार मानले.
सारथीला आणखी पाच एकर जागा द्या : संभाजीराजे
सारथी संस्था मराठा समाजाचा कणा आहे. समाजाच्या उद्धारासाठी संस्थेला स्वायत्तता मिळणे आवश्यक होते. यासाठी वेळोवेळी संघर्ष केला, चर्चा केली. सरकारने सारथीचा प्रश्न मार्गी लावला. राजर्षी शाहू महाराजांच्या कर्म भूमीत सारथीचे उपकेंद्र सुरु झाले. या उपकेंद्रात उल्लेखनीय संशोधन होण्यासाठी, विद्यार्थी घडण्यासाठी केंद्र अद्ययावत करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने केंद्राला आणखी पाच एकर जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
दहा दिवसात पूर्ण क्षमतेने उपकेंद्र सुरु : पालकमंत्री सतेज पाटील
सारथीचे उपकेंद्र शाहूनगरीत सुरु झाले आहे. केंद्रासाठी दिलेली इमारतीची सफाई करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने परिश्रम घेतले आहेत. मागील अठरा तासात या इमारतीचे डागडुजी, सफाई करुन इमारत सुसज्ज करण्यात आली आहे. दोन कर्मचाऱयांची नियुक्ती करुन सोमवारपासून उपकेंद्राचे कामकाज सुरु होईल. तर पुढील दिवसात हे उपकेंद्र पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्य सरकार मराठा समाजासोबत : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
सारथीचे उपकेंद्र कोल्हापूरमध्ये सुरु करुन राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे दिसून येते. आरक्षणासाठीही सरकारकडून पाठपुरावा सुरु आहे. राज्य सरकार नेहमीचे मराठा समाजासोबत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.