सीईएन विभागाची कारवाई, 2 कोटी 33 लाख रुपये जप्त : 88 लाख संबंधितांना परत
प्रतिनिधी /बेळगाव
येथील सीईएन (सायबर ईकॉनॉमिक नार्कोटिक्स) पोलिसांनी गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांची 1825 खाती गोठविली आहेत. त्यांच्या बँक खात्यातून 2 कोटी 33 लाख 9 हजार 350 रुपये जप्त करण्यात आले असून ते संबंधितांना परत करण्यात येत आहेत.
गेल्या वर्षभरात 1 हजार 309 सायबर गुन्हेगारीची प्रकरणे घडली आहेत. यापैकी काही प्रकरणांत एफआयआर दाखल तर काही प्रकरणांमध्ये अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. सायबर गुन्हेगारांनी एकूण 2 कोटी 45 लाख 37 हजार 52 रुपये हडप केले होते. या प्रकरणांचा तपास करत पोलिसांनी सव्वादोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली असून यापैकी 88 लाख 10 हजार 347 रुपये संबंधितांना परत केले आहेत. अद्याप 1 कोटी 44 लाख 99 हजार रुपये परत करायचे आहेत. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रक्कम परत करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कामगिरी केली आहे.
सायबर गुन्हेगारीसंबंधी बेळगाव शहर व उपनगरांतील बँक अधिकाऱयांची बैठक घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वेगवेगळय़ा माध्यमातून सायबर गुन्हेगार सक्रिय आहेत. एखाद्या बँक ग्राहकाची रक्कम हडप केल्यानंतर तातडीने यासंबंधीची माहिती सीईएन विभागाला द्यावी किंवा 112 क्रमांकावर माहिती द्यावी, संबंधित बँक खात्यालाही माहिती द्यावी, लवकरात लवकर माहिती मिळाल्यास गुन्हेगारांनी हडप केलेली रक्कम परत मिळविता येते, असे पोलीस उपायुक्तांनी पत्रकात म्हटले आहे.
सोशल मीडिया, शाळा-कॉलेजमध्ये जागृती
सायबर गुन्हेगारांच्या सापळय़ात अडकून पैसे गमाविलेल्या दहा जणांना पोलीस मुख्यालयात बोलावून त्यांना सांकेतिकपणे रक्कम परत करण्यात आली आहे. सध्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागृती मास साजरा केला जात आहे. सोशल मीडिया व शाळा-कॉलेजमधून यासंबंधी जागृती करण्यात येत आहे. सायबर गुन्हेगारीचा प्रकार घडल्यास तातडीने 0831-2950320 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









