लॉकडाउनमध्ये अनेक तरुण-तरुणींच्या नोकऱया गेल्याने ते त्रस्त झाले आहेत. लोक घरांमध्ये कैद होऊनही वैतागले आहेत. या काळात आत्महत्येच्या घटनाही मोठय़ा प्रमाणात वाढल्या. पण केरळमधील एका युवक नैराश्याने ग्रस्त लोकांसाठी उदाहरण ठरला आहे. गोगुल या युवकाची लॉकडाउनमध्ये नोकरी गेली होती आणि तोही चिंतेत पडला होता. पण सायकलने त्याच्या सर्व समस्या सोडविल्या आहेत. त्याने सायकलवर स्वार होत वेगळीच वाट धरली आहे.
वीज विभागात नोकरी

वीज विभागात प्रकल्प इंजिनियर म्हणून काम करत होतो. पण लॉकडाउन लागू होताच माझी नोकरी गेली. यानंतर नैराश्य आल्याचे गोगुल सांगतो. जीवनात माणूस जेव्हा त्रस्त असतो तेव्हा त्याने प्रवास करावा असे म्हटले जाते. हाच विचार मनाशी बाळगून त्याने प्रवासाचा निर्धार केला. त्याने स्वतःला या खराब काळातून बाहेर काढण्यासाठी सायकल हाताशी घेत प्रवासास निघणे श्रेयस्कर मानले.
5000 किलोमीटरचा प्रवास
गोगुल केरळपासून जम्मू-काश्मीरपर्यंत सायकलने पोहोचला आहे. या प्रवासात लोकांनी त्याला चांगले अनुभव तसेच सन्मान दिला आहे. हा प्रवास संपवून मी थेट घरी जाणार आहे. तेथे जाऊन परत नोकरी पत्करणार असून स्वतःच्या मुलांची काळजी घेणार असल्याचे तो सांगतो. नोकरी गेल्याने उत्पन्नाचे साधनच नव्हते. यातूनच नैराश्यात लोटला गेलो. कुटुंबीय वारंवार नोकरी करण्यासाठी दबाव टाकत होते. मुलेही त्यांच्या स्वभावानुसार मागण्या करत होते. त्यावेळी आत्महत्येचा विचार आला, पण स्वतःच्या घरातूनच सायकलने देशभ्रमंतीवर निघाल्याचे गोगुलने म्हटले आहे.
प्रवासादरम्यान अनेक प्रकारच्या लोकांना भेटलो, लोकांनी स्वतःच्या घरात देखील राहण्याची जागा दिली, मानसन्मान दिल्याचे तो सांगतो. गोगुलने सायकलवरूनच जम्मू-काश्मीर येथून केरळमध्ये परतणार आहे. संकटसमयी हार मानणाऱया लोकांसाठी गोगुलची गोष्ट एक उदाहरण आहे.









