वॉशिंग्टन/ वृत्तसंस्था
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व सिनियर व्हॉईट हाऊस सल्लागार इव्हान्का ट्रम्प हिने 15 वर्षीय ज्योती कुमारच्या साहसाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. भारतात लॉकडाऊन सुरु असताना ज्योतीने आपल्या आजारी वडिलांना घेऊन सायकलवरुन चक्क 1200 किलोमीटर्सचे अंतर कापत घर गाठले होते. याचा संदर्भ देत इव्हान्काने सहनशक्ती व प्रेमाचा हा सुंदर अविष्कार आहे, असे ट्वीट केले.
मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाला, त्यावेळी ज्योती व तिचे वडील मोहन पास्वान हे हरियाणातील गुरुग्राम येथे अडकले. प्रवासावरील बंधनामुळे पुढे जाणे अवघड होते. कोणतेही वाहन उपलब्ध होण्याचीही शक्यता नव्हती. अशा प्रतिकूल परिस्थितीत ज्योतीने वडिलांना सायकलच्या कॅरियरवर बसवले आणि चक्क 1200 किलोमीटर्स सायकलिंग करत बिहारमधील आपले गाव गाठले. जे पैसे शिल्लक होते, त्यातून सायकल विकत घेत त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. भारतीय सायकलिंग फेडरेशनने याची प्राधान्याने दखल घेत तिला लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर चाचणीसाठी दिल्लीत बोलावत असल्याचे जाहीर केले.
इव्हान्काने शुक्रवारी या भारतीय कन्येची साहसी कथा ट्वीटरवर मांडली आणि तिचे मुक्त कंठाने कौतुकही केले. आठव्या इयत्तेत शिकणाऱया ज्योतीचा हा साहसी पराक्रम यामुळे जगभरात इव्हान्काला फॉलो करणाऱया प्रत्येक युझरपर्यंत पोहोचला. ‘ज्योतीच्या सहनशक्ती व प्रेमाचा हा अविष्कार भारतीय नागरिक आणि भारतीय सायकलिंग फेडरेशनपर्यंत पोहोचला आहे’, असे इव्हान्का आपल्या ट्वीटमध्ये म्हणाली.
इव्हान्का ही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी रोजगार निर्मिती सल्लागार म्हणून कार्यरत असून ती यापूर्वी दोन वेळा भारत दौऱयावर येऊन गेली आहे. 2017 मध्ये भारतात झालेल्या जागतिक व्यापार परिषदेत तिने अमेरिकन पथकाचे नेतृत्वही केले होते.









