नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
गुडिया सामूहिक बलात्कार प्रकरणात दोन्ही गुन्हेगारांना दिल्लीच्या एका न्यायालयाने 20 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने पीडित मुलीला 11 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेशही दिला आहे. कडकडडूमा न्यायालयाने मनोज शाह आणि प्रदिप कुमारला शिक्षा ठोठावली आहे. दोषींना कठोर शिक्षा करण्यात आली नसल्याचे म्हणत पीडित पक्षाने या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे.
दोषींना केलेला गुन्हा पाहता ही शिक्षा तोकडी ठरणार आहे. अधिक कठोर शिक्षेसाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे या प्रकरणातील तक्रारदार बचपन बचाओ आंदोलनाचे वकील एच.एस. फुल्का यांनी म्हटले आहे.
पूर्व दिल्लीच्या गांधीनगर भागात 15 एप्रिल 2013 रोजी 5 वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाईस विलंब झाल्याने जनआक्रोश निर्माण झाला होता. दोन्ही गुन्हेगारांनी मुलींवर बलात्कार केल्यावर तिला मृत समजून पळ काढला होता. दिल्ली पोलिसांनी या गुन्हेगारांना बिहारमधून अटक केली होती.









