श्रीपेवाडी हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त भाकणूक : कृष्णात डोणे महाराजांनी केली कथन : पालखी मिरवणुकीने यात्रेची सांगता
महेश शिंपुकडे /निपाणी
तांबं-लोखंड मोलानं विकंल, येईल येईल गुंडांचं राज्य येईल, नोकरदार ऐटीत खातील, बिनधास्त राहतील, संप-हरताळाचं संकट देशावर येईल, तरुणवर्ग बेरोजगार राहील, सामान्य माणसाला धान्य महागात मिळंल, पेट्रोल-डिझेल, गॅस, दर वाढतच राहील, महागाईचा भस्मासूर सुटंल, वाढता आगडोंब वाढतच राहील, सामान्य कष्टकऱयाला जगणं मुश्कील होऊन बसंल, शेतीसाठी खून पडतील, निपाणी भागात मोठा गोंधळ होईल, अतिरेकी येतील, निपाणीला राजकीय धक्का बसंल अशी हालसिद्धनाथांची भाकणूक कृष्णात डोणे महाराज-वाघापूर यांनी केली.
विजयादशमी दसऱयानंतरच्या द्वादशीला होणारी श्रीपेवाडी येथील हालसिद्धनाथांची यात्रा शुक्रवारी पार पडली. यात्रेनिमित्त पूजा विधी, अभिषेक, पालखी मिरवणूक, ढोलवादन, जागर, फटाक्यांची आतषबाजी, हत्यार खेळविणे, धनगरी ओव्या आदी कार्यक्रम पार पडले. शनिवारी पहाटे हालसिद्धनाथांची पहिली भाकणूक कृष्णात डोणे महाराज यांनी कथन केली. यावेळी भाविक व महिला उपस्थित होत्या.
हालसिद्धनाथांचा जयजयकार करा…
मेघयान मळा आकाशाच्या फळा, अमृताच्या धारा हाय बाळांनो मेघ उदंड, हाय हाय बाळांनो बांदाआड बांद, मेघाची कावड गैरहंगामी हाय, मेघाच्या पोटी आजारगा हाय, पिका-पाण्यावर पीक, पाऊस याचा कालमान बदलत जाईल. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा आहे. त्याच्या मागं अंधार आणि पुढही अंधार हाय, कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाचं हाय, पिंजऱयातला राघू भाषण करतुया, धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा, हालसिद्धनाथांचा जयजयकार करा, श्रीपेवाडी गावातील बसवाण देवालय हालसिद्धनाथांची पवित्र भूमी राहील. श्रीपेवाडी प्रति आप्पाचीवाडी होईल.
वैरणीला सोन्याचा भाव येईल…
पिवळय़ा भाषणाचा आघात मोठा वाढत जाईल, आप्पाचीवाडी गावात हालसिद्धनाथांचा ठावठिकाणा हाय, वाघापूरच्या अंगात हालसिद्धनाथ भविष्य संचालक घेतलाय, माझी विटंबना-निंदा करशीला तर मातीत मिसळून जाशीला, खरीप पीक उदंड पिकंल, जमिनीतील धान्य अधिक पिकंल, तांबडी ऱहास मध्यम पिकंल, काळं धान्य सफल होईल, पांढरं धान्य मध्यम पिकंल, पिवळं फूल मध्यम पिकंल आणि मोलानं विकंल, गव्हाच्या पिकाचं नुकसान होईल. धान्य दारात वैरण कोपऱयात अशी स्थिती निर्माण होईल, वैरणीला सोन्याचा भाव येईल, वैरणीसाठी चोऱया-माऱया होतील.
मेंढीच्या मेंढकाला माझा आशीर्वाद हाय
पुकाची मेंढी मोलाची होईल, मेंढीबाई पालखीतून मिरवंल, बैलाचा भाव बकऱयाला येईल, बकऱयाचा भाव एक लाखाच्या घरात जाईल, बकऱयाचा भाव कोंबडय़ाला येईल, कोंबडं मनुष्याच्या पाठी लागंल, धनगराचं बाळ अस्वलाला मेंढी म्हणून मिठी मारंल. आहे ती भाजी-भाकरी सांभाळून खावा, मेंढीच्या मेंढकाला माझा आशीर्वाद हाय, मेंढीची सेवा करेल तो सुखी राहील, मेंढपाळास माझा आशीर्वाद हाय.
चीन देश घातक ठरंल…
चीन देश भारत देशावर आक्रमण करंल, भारत देश स्फूर्तीनं लढंल. असं असलं तरी कोरोनापेक्षा महाभयंकर रोग संपूर्ण जगभरात हाहाकार माजवंल. शास्त्रज्ञ हात टेकतील, घरातून गेलेला मनुष्य घरी परत येईल, अशी आशा धरू नकोसा. ठेचंला मरण हाय, उशाची भाकरी उशाला राहील, बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील, कलियुगात मनुष्य अल्पायुष्य जगंल, माझं माझं म्हणू नका, पाण्याचा कप विकत मिळंल, पाण्यासाठी नंबर लागंल, अठरा तऱहेचे आजार मनुष्याला होतील, डॉक्टर लोक हात टेकतील, रोगाचं कारण चीनच असंल देशासाठी तो घातक ठरंल.
दुधाचा भाव वाढत राहील…
रसयान भांडं उदंड पिकंल अन् मोलानं विकंल, रसाला धारण माणसाला मरण, उसाचा काऊस होईल, ऊस सडकंवर पडंल, मांडवाच्या दारी 4 हजार म्हणतील, 4 हजार म्हणता 3800 वर येईल, 3800 म्हणता 3400 वर येईल, चढलं-उतरलं, साखरेचा भाव तेजी-मंदीत राहील, गुळाचा भाव तेजीत राहील, शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील, साखर सम्राटाची खुर्ची डळमळीत राहील, उसाच्या कांडय़ानं आणि दुधाच्या भांडय़ानं गोंधळ होईल, आंदोलनं पेटतील, शेतकरी चिंतंत राहील, विचार करंल, दुधाचा भाव वाढत जाईल.
समुद्रातील संपत्ती नाश पावंल
तरुण पिढी वाममार्गाला लागंल, कलियुगात उगवत्या सूर्याला संकट पडलंया, चंद्र व सूर्याची टक्कर लागंल, तीन दिवस-तीन रात्र अंधार पडंल, बापावाचून धडा नाही, गुरुवाचून विद्या नाही, एक रुपया गाडीचं चक्र होईल, जगणं मुश्कील होईल, पैशाच्या जोरावर न्याय मिळणार नाही, कागदाचा घोडा दात पाडंल, काळी भांडी जतन करावी, चैत्राच्या महिन्यात गायी गंगेला जातील, समुद्रातील संपत्ती नाश पावंल, उन्हाळय़ाचा पावसाळा आणि पावसाळय़ाचा उन्हाळा होईल, धर्माचा पाऊस, कर्माचं पीक होईल. महायुद्धाला आरंभ होईल, राष्ट्रं आपापसात लढून खेळतील.
सीमाप्रश्न सुटंल…
राजकारणात मोठा गोंधळ होईल, काँग्रेस पक्षात दोन भाग पडून झंझावात लागंल, राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात उडय़ा मारतील, सत्ता, संपत्तीच्या मागे लागतील, कर्नाटक राज्यात उलथापालथ होईल, जातीच्या राजकारणाला ऊत येईल, मोठमोठे भ्रष्टाचार उघडकीस येतील, राजकीय नेते तुरुंगात जातील, सीमाभागाचं राजकारण ढवळून निघंल, गोंधळ होईल, निपाणी भागात मोठा दंगा होईल, अतिरेकी लोक येतील, घोटाळे करतील, बॉम्बस्फोट होतील, कर्नाटक-महाराष्ट्र सीमेचा निकाल लागंल.









