ऍड. आय. आर. घाडी यांचे प्रतिपादन : खानापूर येथे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे स्पर्धा परीक्षेचे आयोजन

प्रतिनिधी /खानापूर
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या समतोल आणि सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे उपक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमुळे करिअरचा मार्ग ठरविण्याचे मार्गदर्शन होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नक्कीच शहरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्याची स्वप्नं बघू शकतो, असे प्रतिपादन खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी यांनी केले.
येथील मराठी सांस्कृतिक प्रतिप्रतिष्ठानच्यावतीने आयोजित पाचव्या तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे उद्घाटन करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिप्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते.
महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन यांच्या बाबतीत खानापूर तालुक्मयातील विद्यार्थी वंचित आहेत. तालुक्मयातील हा एकमेव उपक्रम आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश आणि त्यानंतर खासगी व सरकारी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हा सामान्यज्ञान स्पर्धेचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणारा आहे.’ भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील म्हणाले, ‘दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. शिक्षणाविषयी प्रचंड आवड असूनही घरच्या परिस्थितीमुळे मार्गदर्शनाअभावी संधीपासून दूर राहावे लागते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती मिळावी यासाठी नवोदय आणि एनएमएमएस या परीक्षांच्या तयारीसाठी शिक्षक व पालकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.’
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष किरण गावडे म्हणाले, ‘सामान्य ज्ञान स्पर्धेमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी व तोंडओळख होत असल्याने विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी आतापासूनच तयार केली जात आहे. शिक्षण क्षेत्राला उभारी देणारा हा उपक्रम आहे. नेटक्मया आणि खुल्या वातावरणात होत असलेल्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या मनावरचे दडपण दूर करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.’
नारायण कापोलकर यांनी मातृभाषेच्या शाळा टिकल्या पाहिजेत. यासाठी पालक संमेलन, प्रयोग शाळा व शिक्षकांचा सन्मान, शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा, फिरते वाचनालय, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व यावर प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
यावेळी जि. पं. माजी सदस्य पुंडलिक कारलगेकर, म. ए. समितीचे नेते प्रकाश चव्हाण, ता. पं. माजी सदस्या धनश्री सरदेसाई, डॉ. आय. एम. गुरव, प्रा. एन. एम. सनदी, दीपक देसाई, विठ्ठल गुरव, ईश्वर बोबाटे, मऱयाप्पा पाटील, सतीश पाटील, मोहन पाटील, अरुण पाटील, संतोष चोपडे, प्रा. शंकर गावडा आदी उपस्थित होते. प्रल्हाद मादार यांनी प्रास्ताविक तर वासुदेव चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.
सोळाशेहून अधिक विद्यार्थी सहभागी
ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन अशा तीन गटात घेण्यात आली. स्पर्धेत सोळाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लोकमान्य भवन संस्था, रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय व शिक्षक वर्गाने विशेष परिश्रम घेतले.









