प्रतिनिधी / काणकोण
कोरोना महामारीच्या संदर्भात गोव्यात राबविण्यात येणाऱया सामाजिक सर्वेक्षणाला आज सोमवार 13 पासून सुरुवात होत असून काणकोण मतदारसंघातील 57 मतदान केंद्रांवर मिळून एकूण 228 जणांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अंगणवाडी सेविका, बीएलओ आणि शिक्षकांचा समावेश आहे.
15 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असून या कामासाठी नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱयांना नुकतेच शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आयोजित शिबिरात प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती काणकोण तालुक्यासाठी नियुक्त केलेले निरीक्षक दीपक देसाई यांनी दिली. देसाई आणि काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रीतिदास गावकर या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवून असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना महामारीच्या अनुषंगाने चालू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी दीपक देसाई, पोलीस उपअधीक्षक किरण पौडवाल, निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी पोळे चेकनाका, चावडी त्याचप्रमाणे आगोंद परिसरात पाहणी केली.









