भटक्या विमुक्त जमाती विचार मंचच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील भटक्या विमुक्त जमातीच्या विविध न्याय, हक्क आणि मागण्यांसाठी मार्च महिन्यात सामाजिक न्याय हक्क परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. दलित मित्र व्यंकाप्पा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भटक्या विमुक्त जमाती विचार मंचच्या बैठकीत परिषद आयोजनाचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीविषयीची माहिती देताना व्यंकाप्पा भोसले यांनी सांगितले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भटके विमुक्त मुलभूत हक्कासाठी लढत आहेत. स्वतंत्र भारत देशात माणूस म्हणून अन्न, वस्त्र, निवारा मिळणे आवश्यक होते. पण संशयित गुन्हेगार ठरविल्यामुळे आम्हाला भटकत राहावे लागले. निवार्यासाठी जागा मिळावी, घरे मिळावीत यासाठी शासनाच्या योजना जाहीर होतात. त्याची अंमलबजावणी होत नाही. भटक्या विमुक्त जमातीच्या मुलांना जातीचे दाखले मिळत नाहीत. जमातीच्या चतुर्थ कर्मचार्यांना वारस, अनुकंपा खाली नोकर्या मिळत होत्या, पण 2016 पासून त्यांना नोकर्या मिळणे बंद झाले. त्यासाठी शासनाने विधिमंडळात ठराव केला आहे. व्हीजेएनटीतून आदिवासींच्या जागा भरल्या जात नाहीत, या सर्व प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली. आपल्या न्याय हक्कासाठी मार्चमध्ये सामाजिक न्याय हक्क परिषद घेण्याचा बैठकीत ठराव करण्यात आला, असेही भोसले यांनी सांगितले. बैठकीला गणेश काळे, सुरेश चव्हाण, प्रा. सुनील भोसले, शिवाजी कोरवी, तानाजी नंदीवले, राजू काळे, सुनील पवार, रामचंद्र पोवार, रामसिंग रजपूत, रघुनाथ कांबळे उपस्थित होते.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला बळ
या बैठकीत दिल्ली येथे न्यायासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. तसेच न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या निधनावर शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.









