भारत 2 बाद 98, रोहितचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ सिडनी
तिसऱया कसोटीच्या चौथ्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला 407 धावांचे आव्हान दिले असून दिवसअखेर भारताने सलामीची जोडी गमवित 2 बाद 98 धावा जमविल्या होत्या. त्यांना विजयासाठी अद्याप 309 धावांची गरज आहे. पुनरागमन केलेल्या रोहित शर्माने अर्धशतक (52) नोंदवले तर शुभमन गिलने 31 धावा जमविल्या. कर्णधार रहाणे व पुजारा अनुक्रमे 4 व 9 धावांवर खेळत होते.
या कसोटीच्या तिसऱया दिवशीअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात 2 बाद 103 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून नाबाद फलंदाज लाबुशाने व स्मिथ यांनी खेळ पुढे सुरू केला आणि या दोघांनीही अर्धशतके नोंदवत तिसऱया गडय़ासाठी 103 धावांची शतकी भागीदारी केली. लाबुशानेला सैनीने बाद करून ही जोडी फोडली. त्याने 118 चेंडूत 9 चौकारांसह 73 धावा जमविल्या. नंतर मॅथ्यू वेड पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्याला सैनीनेच 4 धावावर बाद केले. स्मिथला कॅमेरॉन ग्रीनकडून चांगली साथ मिळाली आणि या दोघांनी पाचव्या गडय़ासाठी 60 धावांची भागीदारी केल्यावर स्मिथला अश्विनने पायचीत करून माघारी धाडले. त्याने 167 चेंडूत 8 चौकार, एक षटकारासह 81 धावा काढल्या. ग्रीनने नंतर कर्णधार पेनच्या साथीने 104 धावांची भागीदारी करून संघाला तीनशेची मजल मारून दिली. तो शतकाच्या दिशेने आगेकूच करीत असताना बुमराहने त्याला साहाकरवी झेलबाद केले. त्याने 132 चेंडूत 8 चौकार, 4 षटकारांसह 84 धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यावर पेनने दुसरा डाव 6 बाद 312 धावांवर घोषित करून भारताला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले. पेन 39 धावांवर नाबाद राहताना 52 चेंडूत 6 चौकार मारले. भारतातर्फे सैनी, अश्विन यांनी प्रत्येकी 2 तर बुमराह, सिराज यांनी एकेक बळी मिळविला. भारतीय खेळाडूंनी आजही गचाळ क्षेत्ररक्षण करीत तीन झेल सोडले.
ऑस्ट्रेलियात रोहितचे षटकारांचे अर्धशतक
रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी भारताला पुन्हा एकदा अर्धशतकी सलामी देताना 71 धावा जमविल्या. सामना संपण्याच्या सुमारास प्रथम गिल 31 धावा काढून बाद झाला तर रोहित 11 वे कसोटी अर्धशतक नोंदवल्यानंतर कमिन्सला पुल करताना बाद झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. 98 चेंडूंच्या खेळीत त्याने 5 चौकार व एक षटकार मारताना ऑस्ट्रेलियात एक नवा विक्रमही नोंदवला. ऑस्ट्रेलियामध्ये तो षटकारांचे अर्धशतक नोंदवणारा पहिला विदेशी फलंदाज बनला आहे. त्याने आता 50 षटकार नेंदवले आहेत. विंडीजचा माजी फलंदाज व्हिव रिचर्ड्सने 45 तर ख्रिस गेलने 35 षटकार नोंदवले आहेत. दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्याने भारताला शेवटच्या दिवशी तीन सत्रे खेळून काढावी लागणार आहेत. पहिल्या डावात पुजाराने अतिसंथ फलंदाजी केल्याने त्याच्यावर टीका झाली होती, पण त्याला व कर्णधार रहाणेला अखेरच्या दिवशी सामना वाचवण्यासाठी संथ नसली तरी सावध फलंदाजी करावी लागणार आहे. बचावात्मक खेळ करणारे भारताचे हे दोन सर्वोत्तम फलंदाज आहेत.
अनियमित बाऊन्स व खेळपट्टीवर निर्माण झालेल्या पॅचेसचा लियॉन उपयोग करून घेत असून दोन फलंदाज जायबंदी झाल्याने भारतासमोर तीन सत्रे टिकून राहण्याचे मोठे आव्हान असेल. रोहित व गिल यांनी दडपण असतानाही मन लावून फलंदाजी केली आणि खराब चेंडूवर धावा वसूल केल्या. रोहितने मारलेले तीन कव्हर ड्राईव्ह्ज व गिलने आडव्या बॅटेने मारलेला स्ट्रेटड्राईव्ह लक्षवेधी ठरला. रोहितने ग्रीनला मिडविकेटच्या दिशेने पुलचा षटकारही मारला. दिवसअखेरपर्यंत ते नाबाद राहतील असे वाटत असतानाच दोघेही बाद झाले. विशेष म्हणजे 53 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताने ऑस्ट्रेलियातील एकाच कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतकी सलामी नोंदवली. 53 वर्षांपूर्वीही याच मैदानावर इंजिनियर व अबिद अली यांनी अशी कामगिरी केली होती.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 338, भारत प.डाव 244, ऑस्ट्रेलिया दु.डाव 6 बाद 312 डाव घोषित : वॉर्नर 13, पुकोवस्की 10, लाबुशाने 73 (118 चेंडूत 9 चौकार), स्मिथ 81 (167 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), वेड 4, ग्रीन 84 (132 चेंडूत 8 चौकार, 4 षटकार), टिम पेन नाबाद 39 (52 चेंडूत 6 चौकार), अवांतर 8. गोलंदाजी : सैनी 2-54, अश्विन 2-95, बुमराह 1-68, सिराज 1-90, भारत दु.डाव 34 षटकांत 2 बाद 98 : रोहित शर्मा 52 (98 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), गिल 31 (64 चेंडूत 4 चौकार), पुजारा खेळत आहे 9 (29 चेंडूत 1 चौकार), रहाणे खेळत आहे 4 (14 चेंडू), अवांतर 2. गोलंदाजी : हॅझलवुड 1-11, कमिन्स 1-25, लियॉन 0-22, ग्रीन 0-12, स्टार्क 0-27.









