अहमदाबाद / वृत्तसंस्था
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी येथे सर्व सज्जता करण्यात आली आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानेस उपस्थित राहणार आहेत. हा या मालिकेतील अखेरचा सामना त्यामुळे विशेष महत्वाचा ठरणार आहे.
या पाच दिवशीय सामन्याला आज गुरुवारी सकाळी 9.30 वाजता प्रारंभ होत असून तो बॉर्डर-गावसकर करंडकासाठीच्या या मालिकेतील शेवटचा सामना असेल. तो जिंकल्यास भारताला कसोटींसाठीच्या आयसीसी विजेतेपदाच्या अंतिम फेरीत प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे हा सामना भारतासाठी निर्णायक ठरणार आहे. याआधींच्या सामन्यांपैकी 2 भारताने तर 1 ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
ऑस्टेलियाचे पंतप्रधान गुरुवारी भारतात पोहचले. त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा असून ते मुंबई, अहमदाबाद आणि दिल्लीला भेट देणार आहेत. अहमदाबाद येथे गुरुवारी दोन्ही नेते 1 दिवस कसोटी सामना पाहण्याचा आनंद घेतील. त्यादृष्टीने सामना स्थळी कडेकोट सुरक्ष व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
खेळपट्टीसंबंधी उत्सुकता
मागच्या तीन्ही सामन्यांमध्ये खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला अनुकूल होती. अगदी पहिल्या दिवसापासून फिरकी गोलंदाजांनी फलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. तिसऱया कसोटीत फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारताचा दोन्ही डावांमध्ये धुव्वा उडाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी 9 गडी राखून खिशात टाकली होती. त्यामुळे आता अहमदाबादमध्ये खेळपट्टी अशी असणार ही उत्सुकता सर्वांना आहे.









