19 मे रोजी होणार प्रदर्शित
नेटफ्लिक्सने स्वतःच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. कटहल या चित्रपटात सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. कटहल हा चित्रपट 19 मे रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशन कॅम्पेनला सुरुवात करण्यात आली आहे.

कटहल हा सामाजिक विनोदी धाटणीचा चित्रपट आहे. या चित्रपटाची कहाणी एका स्थानिक राजकारण्याच्या अवतीभोवती घुटमळणारी आहे. या राजकीय नेत्याच्या झाडावरील फणस गायब होतो, हा फणस शोधण्याची जबाबदारी पोलीस अधिकारी महिमाला दिली जाते. या पोलीस अधिकाऱयाची भूमिका सान्याने साकारली आहे. स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी महिमा या विचित्र गुन्हय़ाची उकल करण्यासाठी प्रचंड मेहनत करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. चित्रपटात अनंत जोशी आणि राजपाल यादव देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
कटहल या चित्रपटाची कहाणी अशोक मिश्रा यांची आहे. तर यशोवर्धन मिश्रा यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर, एकता कपूर, गुनीत मोंगा आणि अचिन जैन यांनी बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली केली आहे.
ओटीटीवर थेट प्रदर्शित होणारा सान्याचा पहिला चित्रपट शंकुतला देवी होता. या चित्रपटात तिने विद्या बालनच्या मुलीची भूमिका साकारली होती. यानंतर लूडो, पगलैट आणि मीनाक्षी सुंदरेश्वर हे चित्रपट थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले होते.









