वृत्तसंस्था/ बेंगळुरू
गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळलेली भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आगामी महिला प्रीमियर लीगसाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. सहा ग्रँडस्लॅम किताब आणि 43 डब्ल्यूटीए जेतेपदे जिंकलेल्या सानियाने ‘आरसीबी’च्या निवेदनात म्हटले आहे की, आरसीबी महिला संघात मार्गदर्शक म्हणून सामील होणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
महिला प्रीमियर लीगने भारतीय महिला क्रिकेटमध्ये मोठा बदल घडविला आहे आणि मी या क्रांतिकारी घडामोडीचा एक भाग बनण्यास उत्सुक आहे, असे सानियाने सदर निवेदनात म्हटले आहे. ‘आरसीबी आणि त्याचे ब्रँड तत्वज्ञान माझ्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे जुळते. कारण मी माझ्या खेळाच्या कारकिर्दीकडे त्याच नजरेतून पाहिलेले आहे आणि निवृत्तीनंतरही मी क्रीडा क्षेत्रात त्याच प्रकारे योगदान देऊन पाहत आहे. आरसीबी हा गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमधील एक लोकप्रिय आणि खूप चाहते सलेला संघ आहे. त्यांना महिला प्रीमियर लीगसाठी संघ तयार करताना पाहून मला खूप आनंद झाला आहे’, असे सानियाने म्हटले आहे.
देशातील महिला क्रीडाक्षेत्राला ही घडामोड नवीन उंचीवर नेईल, महिला क्रिकेटपटूंसाठी नवीन दरवाजे उघडतील आणि तरुण मुली तसेच त्यांच्या तरुण पालकांना कारकीर्द घडविण्याच्या दृष्टीने पहिली पसंती म्हणून खेळाची निवड करण्यास मदत होईल, असे मत सानियाने व्यक्त केले आहे. मिर्झा या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळली, जिथे रोहन बोपण्णासमवेत ती मिश्र दुहेरीत उपविजेती ठरली. या महिन्याच्या अखेरीस होणारी एटीपी दुबई ओपन ही तिची शेवटची स्पर्धा असेल, असे तिने जाहीर केलेले आहे. त्यानंतर ती ‘आरसीबी’त सामील होण्याची अपेक्षा आहे.
या नियुक्तीबद्दल ‘आरसीबी’चे प्रमुख आणि उपाध्यक्ष राजेश मेनन यांनी म्हटले आहे की, ‘आरसीबी महिला संघाची मार्गदर्शक म्हणून सानिया मिर्झाचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. कठोर परिश्रम, आवड आणि दृढनिश्चयाच्या जोरावर मिळविलेल्या यशामुळे ती एक आदर्श खेळाडू आहे. सानियाकडे आमची तरुण पिढी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व या नजरेतून पाहते आणि ती आमच्या संघाला प्रेरित तसेच प्रोत्साहित करू शकते. कारण खेळाच्या सर्वोच्च स्तरावर विविध आव्हानांवर मात कशी करायची आणि दबाव कसे हाताळायचे हे तिला चांगल्या प्रकारे माहीत आहे’, असे त्यांनी सांगितले.









