पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार : सानिया मिर्झाने ट्विटर हँडलवर टाकले पत्र
प्रतिनिधी/ नवी दिल्ली
‘तुझ्या उत्कृष्ट कामगिरीतून जगाला भारताच्या क्रीडाक्षेत्रातील ताकदीची झलक दिसली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झाचे तिच्या गौरवशाली कारकिर्दीबद्दल अभिनंदन करताना म्हटले आहे. तिच्यामुळे महिलांना टेनिसमध्ये अधिक प्रमाणात पुढे येऊन उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
आपल्या कारकिर्दीत सहा ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकणाऱ्या सानियाने गेल्या महिन्यात दुबई येथे खेळाचा निरोप घेतला होता. तिथे ती अंतिम स्पर्धा खेळली. सानियाचे अभिनंदन करणाऱ्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, सानियाने भारतीय खेळांवर अविट छाप सोडली आहे आणि खेळाडूंच्या येणाऱ्या पिढीला ती प्रेरणा देईल. सानियाने 9 मार्च रोजी हे पत्र तिच्या ट्विटर हँडलवर टाकले आहे. टेनिसप्रेमींना आता सानिया व्यावसायिक स्तरावर खेळताना दिसणार नाही हे पचवणे कठीण होईल, असे मोदींनी त्यात म्हटले आहे.
सानियाच्या उत्कृष्ट कामगिरीतून जगाला भारताच्या क्रीडा ताकदीची झलक दिसली. जेव्हा सानियाने खेळायला सुऊवात केली होती तेव्हा भारतातील टेनिसची स्थिती खूप वेगळी होती. मात्र सानियाने जे काही साध्य केले त्यातून महिला अधिक प्रमाणात टेनिसकडे वळण्यास आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करण्यास त्यांना प्रेरणा मिळाली. त्यापलीकडे सानियाच्या यशाने इतर अनेक महिलांना बळ दिले, ज्यांना क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवायची होती, परंतु काही कारणास्तव त्या कचरत होत्या, असे पंतप्रधानांनी लिहिले. सानिया युवा क्रीडा प्रतिभेला मार्गदर्शन करत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सानियाने याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानताना म्हटले आहे की, अशा प्रकारच्या प्रेरणादायी शब्दांसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छिते. माझी सर्वोत्कृष्ट क्षमता वापरून देशाचे प्रतिनिधीत्व करताना मला नेहमीच अभिमान वाटलेला आहे आणि भारताला अभिमान वाटावा यासाठी मी जे काही करू शकते ते करत राहीन. आपल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, असे दुहेरीतील जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानावर राहिलेल्या या खेळाडूने म्हटले आहे. सानिया मिर्झाची नुकतीच ‘महिला प्रीमियर लीग’मधील ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर’ संघाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.









