प्रतिनिधी/ बेळगाव
श्रावण शुक्रवारनिमित्त घराघरात श्रावणाच्या गौरीची प्रति÷ापना करण्यात आली. महिलांनी सर्व विधिवत पूजन करून गौरीला स्थानापन्न केले. परंतु यंदा म्हणावा तसा उत्साह मात्र दिसून आला नाही. श्रावण म्हणजे महिलांना परस्परांना भेटण्याची, दोन घटका मनोरंजन करण्याची हक्काची संधी होय.
श्रावण सोमवार, श्रावणातील मंगळागौर, श्रावण शुक्रवार अशा अनेक निमित्ताने महिलांना एकत्र यायला मिळायचे. सोमवारी मैत्रिणींसमवेत शिवमंदिराला जायचे, मंगळागौरीसाठी सोमवारी पत्री खुडून विविध प्रकारची फुले जमविण्यात मैत्रिणींसमवेत फिरायचे, मंगळवारी मोठय़ा हौसेने मंगळागौर सजवायची आणि संध्याकाळी हळदीकुंकू करून रात्री जागर करायचा, असा एकूण थाट असायचा.
या निमित्ताने ठेवणीतील रेशमी वस्त्रे म्हणजेच साडय़ा बाहेर काढल्या जायच्या. चैत्रात त्यांना आठवणीने ऊन दिलेले असते. त्यामुळे कसर लागण्याचा धोका कमी असतो. श्रावणाची तयारी महिला आधिपासूनच करू लागतात. ही रेशमी वस्त्रे नेसून परस्परांकडे हळदीकुंकवाला जायचे, हा क्रम असायचा. बेळगावात श्रावणात घरोघरी आणि सार्वजनिकरित्यासुद्धा अनेक कार्यक्रम होत असतात.
कोरोनाने मात्र यंदा सर्वांच्याच आनंदावर विरजण टाकले आहे. श्रावणापर्यंत तरी कोरोना बेळगावमधून हद्दपार होईल, ही आशा धुसर झाली आहे. आता श्रावणच काय गणेशोत्सवसुद्धा साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ आले, परंतु माणसे दुरावली. कोरोनाने हा दुरावा आणखीनच घट्ट केला. सामाजिक अंतर पाळण्याचा नियम झाला आणि माणसे एकमेकांपासून दूर राहू लागली.
बाजारपेठेवरसुद्धा परिणाम
बाजारपेठेवरसुद्धा याचा परिणाम जाणवू लागला आहे. सराफी पेढय़ांवर याचा परिणाम झाला आहे. श्रावणामध्ये दरवषी सोन्याचा एखादा दागिना किंवा चांदीचा एखादा दिवा, अथवा पूजेच्या साहित्यापैकी एखादे निरांजन व तत्सम वस्तूंची खरेदी होते. या खरेदीवरही यंदा मर्यादा आल्या आहेत.
काळ कठीण आहे, पण तो संपणार आहे. तोपर्यंत कोरोनाच्या निमित्ताने करण्यात आलेले नियम पाळणे भाग आहे. घरापुरती पूजा करून कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, इतकी प्रार्थना तर आपण नक्कीच करू शकतो. सर्व महिलांनी श्रावणातील गौरीची प्राणप्रति÷ा करताना हीच प्रार्थना केली.









