महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर पालघर जिल्हय़ात किडनी किंवा मुलं चोरणाऱयांची टोळी आली आहे अशा गैरसमजातून मॉबलिचिंगचा प्रकार घडला असून त्यामध्ये दोन साधूंची हत्या झाली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी अशीच आहे. लॉकडाऊनच्या काळात गुजरातेत मृत्यू पावलेल्या गुरूंच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या साधुंची गाडी पोलिसांनी पकडली. राज्याची सीमा ओलांडून त्यांना जाता येणार नाही असे सांगून परत पाठविल्याने गाडी चालकाने दादरा-नगर हवेली जवळच्या जंगलातून पोलिसांना चुकवत गाडी न्यायचा निर्णय घेतला आणि साधुंच्या दुर्दैवाचा फेरा सुरू झाला. हे वाहन पालघर जिल्हय़ाच्या ज्या भागातून गेले त्या भागात यापूर्वीही अशा वाहनांवर हल्ले झाले होते आणि त्याची कल्पना बहुधा त्या चालकाला नसावी. त्याने तो धोका पत्करला आणि लोकांनी हे वाहन घेरले. वन खात्याच्या आणि पोलिसांच्या आश्रयाला हे लोक गेले. मात्र त्यांच्या ताब्यातून हिसकावून घेऊन लोकांनी हत्या केली. व्यक्तींचा समूह जेव्हा जमाव बनतो तेव्हा तो अनियंत्रित बनतो. आणि अनियंत्रीत गर्दीचा उन्माद गंभीर गुन्हा घडण्यास कारणीभूत ठरतो. हे लोक चोर नाहीत साधू आहेत हे त्यांच्या भगव्या वस्त्रांना पाहून देखिल मानायला हे लोक तयार झाले नाहीत. त्यांच्या डोक्यात राग होता तो अनेक प्रयत्नानंतरही हाती न लागलेल्या चोरांच्या टोळीचा. त्यात बिचारे साधू हकनाक बळी गेले. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मात्र जे राजकीय वळण घेतले गेले आहे ते त्या आदिवासींच्या कृतीपेक्षाही भयानक आहे. जाणते लोक जेव्हा अशा कृतीचे भांडवल आणि राजकारण करतात तेव्हा त्याचा गांभिर्याने विचार करावा लागतो. पालघरच्या आदिवासी लोकांनी साधुंची हत्या केली. पण, उत्तर भारतातील मंडळी, ज्यांच्या डोक्यात फक्त आणि फक्त जातीय ध्रुवीकरणच भरलेले आहे, त्यांनी त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. नागा साधुंची हत्या करण्यात काही भिन्न धर्मीय लोक होते अशी अफवा समाजमाध्यमांवरून उठविण्यात आली. आपोआपच त्याचे तीव्र पडसाद हिंदी पट्टय़ातील अनेक राज्यांमधून समाज माध्यमांवरच उठायला लागले. काहींनी नागा साधुंच्या नावानेही समाजमाध्यमांवर चर्चा उठवली. आम्ही महाराष्ट्रात घुसून अशा लोकांचा समाचार घेऊ असे हे साधू सांगत असल्याचे पसरवण्यात येऊ लागले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही फोन वरून साधुंच्या सुरक्षितेबाबत चिंता व्यक्त केली. हे सारे प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी टीका सुरू केले. इतके सारे घडते आहे म्हटल्यानंतर आणि भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत म्हटल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनीही तातडीने खुलासा केला. साधुंची हत्या ज्या गावामध्ये झाली आहे, त्या गावात गेले दहा वर्षे भाजपची सत्ता आहे. तिथल्या सरपंचही भाजपच्या होत्या आणि सरकारने ज्या शंभर लोकांना अटक केली आहे त्यातील बहुतांश व्यक्ती या भाजपच्या सदस्य आहेत. असा खुलासा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. यावरून पुन्हा दोन पक्षांमध्ये जुंपली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना अफवा उठविणाऱयांवर कारवाई करण्याची आणि यात राजकारण न करण्याचे आवाहन केले. पोलिसांनी मॉबलिचिंग प्रकरणातील शंभरहून अधिक जणांना अटक केली आहे आणि प्रकरण सीआयडी क्राइमकडे चौकशीला सोपवले आहे. या सगळय़ा बाबी इतक्या सविस्तर सांगण्याचे कारण म्हणजे, मूळ घटना जी घडली होती त्यातील साधुंच्या मृत्यूचे दुःख राहिले बाजुला. राजकीय पक्ष वेगळय़ाच मढय़ावर रडत होते. त्यांचे गहिवर देखिल वेगळय़ाच बाबतीत होते. ही सगळी घटना ज्या कोरोनाच्या करणामुळे घडली, त्या आव्हानाला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतीत साधुंना आपला मूळ रस्ता सोडून आडरस्त्याने जावे लागले आणि या आडरस्त्याला दबा धरून जसे आदिवासी बसले होते तसेच राजकीय पक्षही दबा धरून असावेत याची जाणीव ना मृतांना होती ना त्यांना मारणाऱया आदिवासींना. त्यांच्या माथ्यावर साधुंच्या हत्येचे पातक आलेच आहे शिवाय हत्येच्या गुन्हय़ात अटकही झाली आहे. या प्रकरणात निलंबित झालेले पोलीस अधिकारी भविष्यात साक्षीदार होतील आणि सरकारी कर्मचारी म्हणून त्यांनी आपली जबाबदारी ठीक पार पाडली तर या हत्येत पुढाकार घेतलेल्यांना गंभीर शिक्षा होऊ शकते. पण, अफवा उठविणाऱयांच्या माथ्यावर ना साधुंच्या हत्येचे पातक लागते ना दंगली घडविल्याचे. भाजप आज कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा मांडत आहे. पण, त्यांच्या कारकिर्दीतही पाच लोकांना जमावाने याच कारणाने ठेचून मारलेले आहे याचा देवेंद्र फडणविसांना फार लवकर विसर पडला किंवा ते सोयीस्कररित्या सर्व विसरले असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. पोरांना पळविणाऱया, त्यांचे अवयव काढून घेणाऱया, महिलांना पळवून नेणाऱया टोळय़ा अनेक राज्यांच्या सीमावर्ती भागात, आदिवासी पाडय़ांवर आणि डेंगर, दऱयांच्या भागात कार्यरत आहेत. अनेक डोंगरी भागातील मेंढपाळ महिला दुरून एखादी गाडी येताना पाहून आजही भितीने धावत सुटते हे गंभीर वास्तव आहे. खनिज उत्खनन जेथे जेथे होते त्या भागात तर अशा सर्रास घटना घडतात. त्यांच्या मदतीला कायदा कधीच येत नाही. त्यामुळेच आदिवासींच्या पाडय़ांवर लोकांनी स्वतःच कायदा हातात घेतला आहे हे वास्तव आहे. शहरी नजरेने आणि धर्मांधपणाने अशा घटनेकडे पाहण्यापूर्वी हजारवेळा या वास्तवाचा विचार झाला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था खऱया अर्थाने या पाडय़ांवर आधी निर्माण झाली पाहिजे. ती फडणविसांनी केली नाही म्हणून ठाकरेंनीही करू नये असे नाही. त्यामुळे खरे आव्हान तिथे आहे. गुन्हेगार साधुंच्या वेशात फिरतात अशी लोकांची धारणा असेल तर त्यावर सरकार काय करते? पोलीस काय करतात हा प्रश्नच आहे. या हत्या निषेधार्हच आहे. पण, त्याहून गंभीर पातक त्याच्या राजकारणात दडले आहे. कुणाच्या तरी गुन्हय़ात बळी ठरलेले स्वतःच शिक्षा देत आहेत. आणि त्यांना आम्ही शिक्षा करू असे काही साधूही संतापातून सांगत आहेत. हत्या आणि त्याच्या पातकाचा असा हा दुर्दैवी फेरा आहे. राजकीय पक्षांनी रंग फासायचा धंदा सोडून त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.
Previous Articleपुन्हा शेवटचे कविसंमेलन
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








