अध्याय अकरावा
भगवंत उद्धवाला साधूंची उत्तमोत्तम अशी तीस लक्षणे सांगत आहेत. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, साधूचे परोपकार हे सातवे लक्षण आहे. वृक्ष ज्याप्रमाणे पाने, फुले, छाया, फळ, साल, लाकूड, इत्यादि प्रत्येक अंगाने लोकांना फलदायक होतो व सर्वावर नेहमी परोपकारच करीत असतो. त्याप्रमाणे साधू कोणताही भेदभाव न करता सर्वांवर परोपकार करत असतो. साधुचा पुढील गुण निरिच्छता हा आहे. त्याला कोणतीही आणि कसलीही इच्छा होत नाही. खरं म्हणजे साधूला अप्राप्य असं काहीच नसतं पण तो प्राप्त झालेल्या स्थितीतच मोठय़ा आनंदाने आत्मानुभवाने शोभत असतो. मनोवृत्तीचे नियमन केले की, बाह्येनद्रियांचेही नियमन होते. अशा स्थितीत जे कर्म घडते, ते निःसंशय निष्काम असेच होते. मन आत्मस्वरूपात जडले आणि बाह्येनद्रिये माझ्या भक्तीमध्ये तल्लीन झाली म्हणजे जी जी कर्मे घडतात, ती ती ब्रह्मस्वरूपच होतात अशा प्रकारे बाह्येनद्रियांचे नियमन करण्याचा गुण हीच साधूची ‘दांतता’ म्हणजे निग्रहशक्ति समजावी. साधूचे अंतःकरण सर्वांनाच अत्यंत कोमल वाटते. साधूही सर्वांशी केवळ मृदु आणि गोड वागतो. ह्यालाच साधूची अत्यंत मृदुलता असे नाव आहे. स्त्रीची व धनाची इच्छा न धरणे हीच साधूंची पवित्रता होय. कुंभार मडके करून ते चाकावरून उतरून घेतो, तरी त्याचे चाक पूर्वीच्या गतीने फिरतच असते. त्याप्रमाणे साधु पूर्वसंस्काराप्रमाणे आपली कर्मे करतो, पण तो वृत्तिशून्य असतो. आता बारावे लक्षण ऐक.
कोणत्याही वस्तूचा संग्रह किंवा स्वीकार करण्याचा विचार मनाला शिवतही नाही. अशी वृत्ती म्हणजेच साधूची ‘अपरिग्रहता’ होय. देहाची किंवा घरादाराचीसुद्धा संगती न धरणे याचेच नांव अकिंचनता. ज्याप्रमाणे स्फटिक काजळावर ठेवला तर तो काळा दिसतो, तांबडय़ा रंगावर जर ठेवला तर लाल रंगाचा दिसतो, निळय़ा रंगावर जर ठेवला तर तो निळय़ा वर्णाचाच असल्याचा भास होतो. पण तो शुद्धस्वरूपाने निराळाच असतो.
त्याप्रमाणे साधूही वस्तूंचा संग्रह करणाऱयांमध्ये राहतो, तो संग्रहकर्ता आहे असेही वाटेल परंतु जागृति, स्वप्न, सुषुति, यातील कोणत्याही अवस्थेत तो संग्रहीपणाला स्पर्शही करीत नाही. चैतन्यस्वरूपामध्येच मन जडले, सर्व विश्व चैतन्यानेच भरलेले आहे असे वाटू लागले, परिग्रहाची आठवण नाहीशी झाली की, त्या स्थितीलाच आकिंचनपणा असे नाव आहे. घरातील प्रपंच सोडून अरण्यात गेला आणि अरण्यातही स्त्रीचे चिंतन करू लागला, तर तो त्यागच त्याला बाधक होतो व तो फिरून परिग्रहांत पडतो.
हे म्हणजे, आळी भिंतीवर चढत असते पण ते तिचे चढावयाचे कष्ट वाया जातात कारण ती पूर्वीपेक्षाही अधिक खोल पडून उताणी होते आणि अत्यंत दुःख भोगते. पण मुंगीचे मात्र तसे नाही. ती आळीला घेऊन वृक्षावर जाते. पाहावयास गेले तर मुंगी लहान व आळी थोर असते. तरी पण मुंगी आळीचा उद्धार करू शकते. त्याप्रमाणे जे अकिंचन पुरुष असतात तेही सर्वांचा उद्धार करतात. देहात असून ज्याने देह मिथ्या करून सोडला, तोच खरोखर अकिंचन झाला म्हणून समजावे. अंतर्बाह्य त्याग करूनच शुक आणि नारद हे तिन्ही लोकांत अत्यंत पवित्र झाले पण ते दोघेही येऊन जनक राजाच्या पायी लागले. कारण, जनक हा राज्य करीत असताही विदेही होता. यावरून जनकाची अकिंचनता लक्षात घे आता ‘अनीहेबद्दल सांगतो ऐक. निरिच्छतेबद्दल पूर्वी मी तुझ्याशी बोललोय पण ते पुरेसं नाही त्याबद्दल सविस्तर सांगतो. ईहा म्हणजे इच्छा आणि अनीहा म्हणजे निरिच्छता. सर्वांना इच्छांनी वेढलेले असल्याने निरिच्छता दीन झाली होती. ती ज्याच्याकडे जाई तो तिला दूर घालवून देत असे. तिला कोणी अर्धी घटकासुद्धा थारा देत नसे. अशा प्रकारे ती निराश्रित झाल्यामुळे चरफडत होती. आपल्या परिस्थितीचे गाऱहाणे सांगावयाला संतांपुढे आली. ते मूळचेच कृपाळू असल्यामुळे त्यांना तिची दया येऊन त्यांनी आपल्या हातांनी तिचे डोळे पुसले आणि आपल्या हिताकरिता तिचा प्रतिपाळ केला.
क्रमशः








