पुलाची शिरोली / वार्ताहर
दुरुस्तीचे काम करुन ट्रायलसाठी सादळे-मादळे घाटात नेलेल्या बीएमडब्ल्यू मोटारीने पेट घेतला. प्रसंगावधान दाखवत चालकाने चालू मोटारीतून उडी घेत स्वतःचा जीव वाचवला. मोटार मात्र जळून खाक झाली. यामध्ये मोटारीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळी मिळालेली माहीती अशी की, सलीम अहमद ( रा. गोवा ) यांच्या बीएमडब्ल्यू मोटारीची (एमएच १२ बीएक्स ४५४५ ) ईबीएस सिस्टिम काम करत नव्हती म्हणुन त्यांनी पुलाची शिरोली येथील माळवडी येथे समीर मिस्त्री ( वय ३० ) यांचेकडे दुरुस्तीला सोडली होती. काल रात्री अकरा वाजता मोटारीचे काम करून मिस्त्री यांनी ट्रायलसाठी ही मोटार सादळे-मादळे घाटात नेली. परत येताना ब्रेक लागले नाहीत म्हणुन मिस्त्रीने खाली उडी मारली. आणि मोटार पूढे जाऊन दगडाला धडकली. या धडकेत मोटारीने अचानक पेट घेतला. बघता बघता मोटार जळून खाक झाली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.
एवढ्या रात्री सादळे-मादळे घाटात ट्रायल घेणे आवश्यक होते का? तसेच अचानक पेट घेतल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी याबाबत पोलिसांत तक्रार का झाली नाही? असे काही प्रश्न अनुत्तरित आहेत.









