मानवी समाजाचा वावर या पृथ्वीतलावरती सुरू झाल्यापासून साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन माणसे मृत्यूमुखी पडण्याची प्रकरणे उद्भवत आहेत. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे मानवी जीवनाला मिटवू पाहणाऱया बऱयाच साथीच्या रोगांवरती नियंत्रण प्रस्थापित करणे शक्मय झालेले आहे. यातले बरेचसे साथीचे रोग आपला परिसर गलिच्छ ठेवल्याने केरकचरा, सांडपाणी यांची विल्हेवाट लावण्यात आलेल्या आपल्या अपयशामुळे निर्माण झाले आहे. त्यात असंख्य माणसांचे बळी गेलेले आहेत. आज जगभरातल्या बहुतांश राष्ट्रात कोरोना विषाणूने मानवी जगण्याला संकटाच्या खाईत लोटून, त्यांचे अस्तित्व नेस्तनाबूत करण्याला आरंभ केलेला आहे. आपल्या तत्त्वचिंतकांनी मृत्यूला समदृष्टीने पाहणारा म्हटलेले आहे आणि त्यामुळे राव असो अथवा रंक, त्यांच्यात मृत्यू विशेष फरक करत नाही. युरोपात स्पेन देशाची राजकन्या कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडली तर ब्रिटनचा राजपुत्र, इस्रायलची बडी मंडळी कोरोनाशी संघर्ष देत आहेत.
जगभरात महासत्ता ठरलेल्या अमेरिकेत कोरोना विषाणूने मृत्यूचे अगदी थैमान मांडलेले आहे. उत्कृष्ट इस्पितळे आणि आरोग्यविषयक साधनसुविधा असणाऱया इटलीत मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्या झपाटय़ाने वाढत चालली आहे. चीनच्या ज्या वुहान प्रांतातून कोरोना विषाणूचे संकट चीन राष्ट्रात थैमान मांडत अन्य प्रांतात पसरले, तेथील कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत सुधारणा होत असली तरी अन्य ठिकाणची स्थिती दयनीय झालेली आहे. आजच्या घडीस जगभरातल्या बऱयाच देशांनी नाकाबंदी करण्याबरोबर सामाजिक अंतर राखण्याचे तसेच स्वच्छतेला प्राधान्य देणे म्हणजेच कोरोना विषाणूचे संकट नियंत्रित करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे सांगितले आहे. आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आयुष्यभर तसेच धडपडणाऱया माणसाला जीवनाश्यक वस्तू मिळवण्यासाठी शिस्त आणि संयमाचा अभाव असल्याने संघर्ष करण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळे नाकाबंदी आणि प्रस्थापित केलेले नियम व अटीच्या चौकटीचे काटेकोरपणे आम्ही पालन केले नाही तर हे संकट मानवी समाजाच्या एकूण अस्तित्वालाच आव्हान देण्याची स्थिती आणणार असल्याची शक्मयता नाकारता येत नाही.
खरंतर साथीचे रोग हे माणसाला नवे नाहीत. देवी, इन्फ्ल्यूएन्झा, चिकुनगुनिया, टायफाईड, डांग्या खोकला, डेंग्यू यासारख्या साथीच्या रोगांनी आजपर्यंत जगभर लाखो लोकांना अकाली मृत्यूच्या खाईत लोटलेले आहे. देवीच्या रोगाने असंख्य लोकांचे जगणे असहय़ केले होते. 1796 साली डॉ. एडवर्ड जेन्नरने देवीवरती लस शोधून काढली परंतु देवी रोगाचा निरोप घेण्यासाठी आपणाला 1975 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. पोलिओसारख्या रोगाने एकेकाळी कहर मांडला होता. रुग्णांच्या लाळ, वि÷ा, शिंकेमार्फत पोलिओचे विषाणू हवा, पाणी, अन्नात पसरत असल्याचे स्पष्ट झालेले असताना त्याबाबत दक्षता घेण्यास असफल ठरल्याने पोलिओने अगणित लोकांना जायबंद केले होते. जागतिक आरोग्य संघटनेने 27 मार्च 2014 रोजी पोलिओ मुक्त झाल्याची घोषणा केलेली आहे. दूषित पाणी पिण्याने होणाऱया नारू रोगाने बरेच बळी घेतले होते. 2001 नंतर नारूचे रुग्ण सापडले नसले तरी शुद्ध पेयजलाची समस्या आजतागायत सुटलेली नाही आणि ही समस्या दिवसेंदिवस बिकट होऊन, असंख्य लोकांना दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱया रोगांनी ग्रस्त करू लागले आहे.
मलेरिया रोगाची साथ इतिहासपूर्व काळापासून आदिमानवासाठी मोठे आव्हान ठरली होती. प्लाझ्मोडियम परजीवीच्या प्रादुर्भावाखाली आलेल्या मच्छराच्या दंशामुळे मानव आणि जनावरांना मलेरिया होत असल्याचे स्पष्ट झाले होते. अंटार्क्टिका वगळता जगभरातल्या अन्य खंडात मलेरियाने लाखो जणांना मृत्यूमुखी टाकले होते. दक्षिण प्रशांत महासागरात दुसऱया जागतिक महायुद्धात लढणाऱया पाच लाख अमेरिकन सैन्यांना मलेरियाची लागण झाली होती. त्यातल्या 60 हजारांना मृत्यू आला होता. उंदराद्वारे प्रसारित होणाऱया पिसूपासून माणसांना प्लेगची लागण होत असल्याचे स्पष्ट झाले होते. चौदाव्या शतकात प्लेगची लागण होऊन 50 लाख लोकांना मृत्यू आला होता. आफ्रिकेतील कोंगो, मादागास्कर, पेरूसारख्या देशात प्लेगचे लक्षणीय रुग्ण आढळले होते. प्लेग हा रोग चीन आणि मध्ययुगीन युरोपात शत्रू पक्षावरती मात करण्यासाठी जैविक हत्यार म्हणून वापरण्याची षड्यंत्रे उघडकीस आलेली आहेत. प्लेगचा प्रादुर्भाव होणाऱया पिसूंची पैदासी करून आणि प्लेगग्रस्त जनावरांचे सांगाडे पाणी पुरवठय़ात टाकण्याचे अघोरी प्रकार जपानी सैन्याने केल्याचे उघडकीस आलेले आहे. त्यामुळे आज जगभरात लोकांना मृत्यूच्या खाईत लोटणारा कोरोना विषाणूचा वापर चीनने अमेरिकेवरती आणि अमेरिकेने चीनवरती केल्याने आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती होत आहे. यावरून आज मानवी समाज वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कुठपर्यंत मजल गाठू शकतो हे उघडकीस आलेले आहे.
बराच काळ मानवी कोरोना विषाणू शांत आणि निरुपद्रवी समजले गेले आणि त्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे सामान्य आजार होऊ शकतात असे मानले जात होते. परंतु एकविसाव्या शतकात जेव्हा कोरोना विषाणूने अती तीव्र श्वसन विकार म्हणजे सार्स आणि मध्यपूर्व श्वसन विकार म्हणजे मेर्ससारख्या रोगांचा प्रादुर्भाव केला तेव्हाच या विषाणूची दाहकता समोर आली. चीनच्या वुहान प्रांतातल्या नाना प्रकारच्या पाळीव तसेच वन्यजीवांच्या मांसाची आणि अन्य अवयवाची विक्री करणाऱया बाजारपेठेतून कोरोना विषाणूचे संकट निर्माण झाल्याचे मानले जाते. चिनी नाग, मण्यारसारखे साप तशीच वटवाघळे याद्वारे हा विषाणू संक्रमित होत असल्याचे मानले जात आहे. आज आमच्या अन्न सेवनाच्या अनारोग्यदायक सवयी आणि त्या संदर्भातले गैरव्यवहार एकंदर सजीवांच्या अस्तित्वावरती घाला घालणार हे स्पष्ट होऊ लागलेले असताना, कचरा, सांडपाणी, मलमूत्र यांची विल्हेवाट लावण्याची बेफिकिरता ऐरणीवरती आलेली आहे यापूर्वी लाखो लोकांच्या मृत्यूस कारण ठरलेले प्लेग, मलेरिया, पोलिओ, कॉलरा, डेंग्यूसारखे रोग आपला परिसर गलिच्छ ठेवल्याने पेयजल दूषित असल्याने निर्माण झालेले आहे. कोरोना विषाणूने ‘न भूतो, न भविष्यति’ सारखी गुंतागुंतीची समस्या निर्माण केलेली आहे, तिला सामोरे जाण्याचे गांभीर्य पाळले नाही तर नाना तऱहेच्या संकटांनी आमचे जगणे संत्रस्त होईल.








