मराठी रंगभूमी दिन जल्लोषात
प्रतिनिधी/ सातारा
गेल्या साडेसात महिन्यापासून बंद असलेल्या शाहू कला मंदिरांचा रंगमंच पुन्हा नव्या जल्लोषात कलावंतांच्या गर्दीने फुलून गेला. कोरोना पार्श्वभूमीवर काळजी घेत या रंगकर्मींनी मराठी रंगभूमी दिन मोठय़ा जल्लोषात साजरा केला. यावेळी रंगमंदिरांची काळजी घेणाऱया सेवकांचा सत्कार करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना नटेश्वराला वंदन करत या जगावरील कोरोनाचे संकट लवकर टळू दे, अशी प्रार्थनाही साताऱयातील रंगकर्मीनी केली.
29 फेब्रुवारी 2020 ला शाहुकला मंदिरात शेवटचा नाटय़प्रयोग सादर झाला आणि नजीकच्या काळात लॉकडाऊन सुरु झालं. अर्थातच त्यामुळे नाटय़गृहांना टाळं लागलं. पाच नोव्हेंबर या मराठी रंगभूमी दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने नाटय़गृह आणि चित्रपटगृह अटी शर्ती घालून उघडण्याची परवानगी दिली. त्यामुळे पहिल्यांदाच मराठी रंगभूमी दिनाच्या अत्यंत पवित्र दिवशी जवळ जवळ सात ते साडेसात महिन्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस रंगकर्मींनी उस्फूर्तपणे शाहुकला मंदिरात हजेरी लावली.
यावेळी धैर्यशील उत्तेकर, अमित तांबे, अभिषेक परदेशी, अमोल जोशी आणि कल्याण राक्षे यांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले. त्यानंतर कल्याण राक्षे आणि चित्रा भिसे या रंगकर्मींच्या हस्ते युवराज शिंगाडे आणि दशरथ उंबरकर, मारुती जगताप, मोहन गायकवाड, दिलीप आर्डेकर या कर्मचाऱयांच्या रंगमंदिर सेवेचा गौरव करण्यात आला. साडेसात महिन्यानंतर पहिल्यांदाच रविना गोगावले आणि प्रतीक्षा सदाकळे यांनी आपली स्वगत (नाटय़छटा) सादर केली आणि जमलेल्या रंगकर्मीनी टाळ्यांच्या गजरात या पहिल्या वहिल्या सादरीकरणांच स्वागत केलं.
अजित करडे यांनी आभाराचा प्रस्ताव मांडून त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. प्रसाद नारकर, जमीर आतार, शैलेंद्र पाटील आणि धैर्यशील उत्तेकर यांनी मराठी रंगभूमीदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चित्रा भिसे, शुभम फडतरे, पुष्पा कदम, कुलदिप मोहिते, निकिता कुलकर्णी, सुरज दयाळ, राहुल निकम, महेश पवार, निलेश गौड, आयुष सावंत, इर्शाद शेख, सुरज अवघडे, रोहित कांबळे, आकाश साळुंखे, कल्पेश जमादार, राहुल बगाडे, प्रणव कदम, ऋषिकेश बनसोडे हे रंगकर्मी उपस्थित होते.








