प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात वारणा व चांदोली अभयारण्यातील सात वसाहतींची लोकसंख्या 350 पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे या वसाहतींचे स्वतंत्र महसुली गाव करण्यासाठी त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला. या बैठकीस प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी संपत पाटील यांच्यासह वनविभाग आणि पाटबंधारेचे अधिकारी उपस्थित होते.
कागल तालुक्यातील बाचणीपैकी सातमानानगर वसाहत, कसबा सांगावपैकी वाडदे वसाहत, वाळे वसाहत, हातकणंगले तालुक्यातील भादोलेपैकी चांदोली वसाहत, सोनाली वसाहत, नरंदे वासाहत आजरा तालुक्यातील बुरुडेपैकी चित्रानगर या सात वसाहतींमधील लोकसंख्या 350 पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे या वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याबाबत प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी केला. या मागणीनुसार त्याबाबतचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्याचा सर्वानुमते निर्णय झाला.









