वैभववाडीत भाजपला धक्का : सातही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर
वार्ताहर / वैभववाडी:
मागील दोन महिने वैभववाडी शहरात चर्चेचा विषय असलेल्या सात नगरसेवकांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या सात नगरसेवकांसमवेत तीन प्रमुख कार्यकर्त्यांनी वैभववाडी येथील भाजप कार्यालयात जात सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला आहे. गोपाळ नगर, तांबेवाडी वाभवे व शहरातील कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समजते. या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले असून निवडणुकीच्या तोंडावर एकाच वेळी सात नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
हे सर्व नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधून घेण्यासाठी मुंबईला रवाना झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ‘तरुण भारत’ने महिनाभरापूर्वी नगरसेवकांचा एक गट पक्षांतर करणार असल्याचे दिलेले वृत्त अखेर खरे ठरले आहे.
वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणूक तोंडावर आली असताना नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शिवसेनेमध्ये चैतन्य पसरले आहे. वाभवे वैभववाडीचे पहिले नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, संपदा राणे, दीपा गजोबार या चार माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवकांसह नगरसेवक संतोष पवार, रवींद्र तांबे, स्वप्निल इस्वलकर हे तीन नगरसेवक तसेच भाजप वैभववाडी बुथप्रमुख संतोष निकम, शिवाजी राणे, दीपक गजोबार अशा एकूण दहाजणांनी एकत्रितपणे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
वाभवे वैभववाडी नगर पंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या नगरसेवकांमध्ये पक्षांतर्गत धुसफूस सुरू होती. हे सातही नगरसेवक नाराज होते. या संदर्भात पक्षनेतृत्वाला याची कल्पना होती. मात्र, त्यांनी त्यांना बेदखल केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेचा स्फोट होऊन नगरसेवक पक्षातून बाहेर पडले आहेत. हे सातही नगरसेवक शिवबंधनात बांधले जाणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे येणारी नगर पंचायतीची निवडणूक ही शिवसेना आणि भाजप यांच्यात अटीतटीची होणार हे निश्चित.








