कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव, पावसाचा अडथळा
वृत्तसंस्था/ मोहाली
2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे कोलकाता नाईट रायडर्सचा 7 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी डकवर्थ लेविस नियमानुसार पंजाबला सात धावांनी विजयी म्हणून घोषित केले.

भानुका राजपक्षेच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 192 धावांचे आव्हान दिले. किंग्ज इलेव्हन पंजाबने 20 षटकात 5 बाद 191 धावा जमविल्या. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाला प्रारंभ झाला आणि 16 षटकात त्यांनी 7 बाद 146 धावा जमवल्या असताना पावसाला प्रारंभ झाला त्यामुळे खेळ थांबवावा लागला. ज्यावेळी खेळ थांबवण्यात आला त्यावेळी डकवर्थ लेविस नियमानुसार कोलकाता नाईट रायडर्सला 153 धावसंख्या करणे जरुरीचे होते पण त्यांचा डाव 146 धावावर थांबल्याने किंग्ज इलेव्हन पंजाबने 7 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. हा सामना मोहालीच्या आय. एस. बिंद्रा स्टेडियमवर खेळविला गेला. पंजाब संघाचा कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांनी पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजीवर भर दिला. त्यांनी सलामीच्या गड्यासाठी 2 षटकात 23 धावा झोडपल्या. प्रभसिमरन सिंगने 12 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. या पहिल्या दोन षटकामध्ये धवनने खातेही उघडले नव्हते. कोलकाता नाईट रायडर्सच्या साउदीने प्रभसिमरन सिंगला गुरुबाजकरवी झेलबाद केले. त्यानंतर शिखर धवन आणि लंकेचा भानुका राजपक्षे यांनी संघाला सुस्थितीत नेताना 8 षटकात 86 धावांची भागीदारी केली. राजपक्षेने 32 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 50 धावा झळकविल्या. 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये राजपक्षेचे हे पहिले अर्धशतक आहे. उमेश यादवने राजपक्षेला 11 व्या षटकात झेलबाद केले. साउदीने जितेश शर्माला यादवकरवी झेलबाद केले. शर्माने 11 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. शिखर धवन चौथ्या गड्याच्या रूपात बाद झाला. वरुण चक्रवर्तीने त्याचा त्रिफळा उडविला. धवनने 29 चेंडूत 6 चौकारांसह 40 धावा जमविल्या. सिकंदर रझाने 13 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमविल्या. सॅम करेनने तसेच मोहम्मद शारुख खानने शेवटच्या दोन षटकात फटकेबाजी केल्याने पंजाब संघाला 191 धावांपर्यंत मजल मारता आली. करेनने 17 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 26 तर शारुख खानने 7 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 11 धावा झळकविल्या. पंजाबच्या डावामध्ये 9 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. कोलकाता नाईट रायडर्सतर्फे साउदीने 54 धावात 2 तर उमेश यादव, सुनील नरेन व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. कोलकाता संघाचे नेतृत्व नितीश राणा करीत आहे.

प्रत्युत्तरादाखल खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने 16 षटकात 7 बाद 146 धावापर्यंत मजल मारली. कोलकाताच्या डावामध्ये वेंकटेश अय्यरने 28 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 34, कर्णधार नितीश राणाने 17 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 24, आंद्रे रसेलने 19 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 35, गुरबाजने 16 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22 धावा जमवल्या. मनदीप सिंग 2, रॉय 4, रिंकू सिंग 4 धावावर बाद झाले. शार्दुल ठाकुरने 1 षटकारासह नाबाद 8 तर सुनील नरेनने 1 षटकारासह नाबाद 7 धावा जमवल्या. पंजाबतर्फे अर्शदीप सिंगने 19 धावात 3 तर नाथन इलिस, सिकंदर रझा आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. कोलकाता नाईट रायडर्सच्या डावात 7 षटकार आणि 13 चौकार नोंदवले गेले. कोलकाताची पहिल्या तीन षटकाअखेर स्थिती 3 बाद 19 अशी केविलवाणी होती. पंजाबच्या अर्शदीप सिंगने आपल्या स्वींग गोलंदाजीवर मनदीप सिंग, अंकुल रॉय यांना लवकर बाद केले. तसेच त्याने वेंकटेश अय्यरचाही बळी मिळवला. या सामन्यात दुसऱ्या डावाला सुमारे 30 मिनिटे उशिरा सुरुवात झाली कारण येथील फ्लडलाईटस्मध्ये बिघाड झाल्याने ही दुरुस्ती करण्यात आल्यानंतर खेळ सुरू झाला.
संक्षिप्त धावफलक : किंग्ज इलेव्हन पंजाब 20 षटकात 5 बाद 191 (प्रभसिमरन सिंग 23, शिखर धवन 40, भानुका राजपक्षे 50, जितेश शर्मा 21, सिकंदर रझा 16, सॅम करन नाबाद 26, शाहरुख खान नाबाद 11, अवांतर 4, साऊदी 2-54, उमेश यादव 1-27, सुनील नरेन 1-40, चक्रवर्ती 1-26), कोलकाता नाईट रायडर्स 16 षटकात 7 बाद 146 (मनदीप सिंग 2, गुरबाज 22, रॉय 4, वेंकटेश अय्यर 34, नितीश राणा 24, रिंकू सिंग 4, रसेल 35, ठाकुर नाबाद 8, सुनील नरेन नाबाद 7, अवांतर 6, सॅम करन 1-3, अर्शदीप सिंग 3-19, नाथन इलिस 1-27, सिकंदर रझा 1-25, राहुल चहर 1-12).








