सातारा / प्रतिनिधी :
झुंजार सैनिक परंपरा लाभलेल्या सातारच्या भुमीत सैन्य भरती केंद्र सुरु करावे, आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मिलिटरी हॉस्पिटल किंवा कमांड हॉस्पिटलच्या अखत्यारितील वैदयकिय उपकेंद्र तातडीने सुरु करावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेवून चर्चा केली.
याविषयी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात उदयनराजे यांनी पुढे नमुद केले आहे की, मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहर आणि जिल्हयाला अव्दितीय अशी सैनिक परंपरा लाभली आहे. मिलिटरी अपशिंगे सारख्या गावांमधील प्रत्येक घरटी किमान एक व्यक्ती ब्रिटीश आमदनीपासून ते आजपर्यंत सैनिकसेवा आणि देशसेवा बजावत आहे. सातारा जिल्हा ज्याप्रमाणे शुरवीरांचा, साधुसंतांचा, मराठा साम्राजयाच्या राजधानीचा जिल्हा म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखला जातो, त्याचप्रमाणे आजी माजी सैनिकांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो.
जिल्हयातील हजारो-लाखो युवक सैन्य भरतीसाठी आसुसलेले असतात. परंतु काही मर्यादा, तांत्रिकतेच्या कारणांमुळे अनेकांची भरती होण्याची संधी हुकत असते. तरी सुध्दा आजरोजी लक्षणिय संख्येने, अनेक युवक सैन्यामध्ये दाखल आहेत. जिल्हयातील माजी सैनिकांची संख्या देखिल सर्वाधिक दखलपात्र आहे. येथुन पुढील पिढी सुध्दा उपजतच सैनिक परंपरा जोपासणारी आहे. त्यामुळे सातारा येथे सैन्य भरती केंद्र असले पाहीजे अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे सैन्य भरती केंद्र सातारा येथे सुरु करण्यात यावे. तसेच आजी-माजी सैनिकांच्या जिल्हयातील सैनिक आणि त्यांचे कुटुंबियांकरीता आर्मी हॉस्पिटलची उभारणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. किमान कमांड हॉस्पिटलचे उपकेंद्र सातारा येथे तातडीने सुरु करण्याबाबत सूचना जारी कराव्यात अशी मागणी देखिल यावेळी उदयनराजे यांनी यावेळी केली.









