प्रतिनिधी/ सातारा
साताऱ्यात चिपळूणकर बाग, दत्त मंदिर चौकात गुरुवार दि. 19 मध्यरात्री काही जणांनी कार, दुचाकी वाहनांना लक्ष्य करत त्याची तोडफोड करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, दोन गटातील वैयक्तिक भांडणातून रोहित बाळकृष्ण झोरे याने हे कृत्य केले असून त्याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, यासंदर्भात दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी मध्यरात्री मंगळवार पेठेत सहा चारचाकी गाडय़ा फोडण्याची घटना समोर आली. सकाळी याबाबत पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार हे कृत्य करणाऱया रोहित बाळकृष्ण झोरे (वय 23, रा. दत्तमंदिर, मंगळवार पेठ, सातारा) याला पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, याप्रकरणी परस्पर विरोधीत तक्रारीही दाखल झाल्या आहेत. यामध्ये आजम रमजान शेख (वय 35, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. रोहित झोरे याने शेख यांची होंडा ऍसेंट गाडीची काच दगडाने फोडली तसेच त्याच परिसरातील अकबर महमंद ककंणपिर यांच्या मारुती कारची मागील व पुढील काच फोडून नुकसान केले. इप्बाल असलम शेख मारुती कार, शशिकांत जितेंद्र बडेकर यांच्या मारुती कार, अमोल मधुकर मोहिते यांच्या मारुती कार या चारचाकी गाडय़ा फोडून नुकसान केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार झोरेवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आलीय.
रोहित झोरे याने दिलेल्या तक्रारीनुसार झोरे याने आयडीबीआय बँक, राजवाडा पेट्रोल पंपाजवळ दुचाकी पार्क केली होती. त्यावरुन वाद झाला होता. त्यावेळी आजम रमजान शेख याने झोरे याच्या दुचाकीला काहीही कारण नसताना धडक देवून नुकसान केले. याबाबत झोरेने विचारणा केली असता त्याला आजम शेख, अकबर महंमद कंकणपिर, इकबाल असलम शेख व शशिकांत जितेंद्र बडेकर यांनी झोरेला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी या चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.









