प्रतिनिधी / सातारा :
पूर्वी दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना हंडाभर पाण्यासाठी नागरिक रात्र-रात्र जागरण करायचे. तशीच काहीशी परिस्थिती आता साताऱ्यात लस मिळविण्याकरीता झाली आहे. लसीचा तुटवडा असल्याने नागरिक आपल्याला लस मिळावी म्हणून रात्रभर सिव्हिल हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्राबाहेर रांग लावतात. एवढे करुनही सकाळी किती जणांना लसीचे टोकन मिळेल हे माहिती नसते.
सकाळी 7 वाजता टोकन वाटप करण्यात येते. जेवढी लस आलेली आहे, तेवढीच टोकन वाटली जातात. इतरांना नुसतीच रात्र जागून काढावी लागत आहे. ज्यांना टोकन मिळते त्यांचे 10.30 वाजता लसीकरण सुरू होते. ज्यांना लसीसाठी टोकन मिळत नाही, त्यांच्या पदरी मात्र, निराशाच येते.