सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यात 59 वर्षांनी प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 1500 जणांचा चमू दाखल होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सातारा जिल्हय़ासह आसपासच्या जिल्हय़ातील मल्लांनी नवी ऊर्जा मिळेल. साताऱ्यात आजपासून सुरू होत असलेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे ‘तरूण भारत’शी बोलत होते. साताऱ्यात स्पर्धा व्हावी, ही खुद्द कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांची इच्छा होती. त्याबरोबरच कुस्तीगीर परिषद व सातारकरांचीही इच्छा होती. साताऱ्यात काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय कुस्तीसाठी निवड चाचणी चांगल्या पद्धतीने पार पडली होती. त्यावेळी महाराष्ट्र केसरीही साताऱ्यात चांगल्या पद्धतीने पार पडू शकते.
आजपासून सातारच्या क्रीडा संकुलात या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 900 मल्ल दाखल झाले आहेत. तसेच राज्याचे सुमारे 45 संघ, कुस्तीगीर परिषदेचे प्रत्येक जिल्हय़ाचे दोन असे 90 प्रतिनिधी, प्रत्येक संघाचे दोन प्रशिक्षक व एक व्यवस्थापक असा सुमारे 1500 जणांचा चमू दाखल झाला आहे. मल्लांची राहण्याची व्यवस्था चांगली करण्यात आली आहे. त्यासाठी पवारांच्या सूचनेनुसार रयत शिक्षण संस्थेच्या शाळा देण्यात आल्या आहेत. स्पर्धेसाठी मातीचे दोन आणि गादीचे तीन आखाडे तयार करण्यात आले आहेत. रोज युटय़ुबवर स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण होणार असून घरबसल्याही स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. एकूणच ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने व निकोप वातावरणात पार पडावी, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. 1963 साली साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती. त्यानंतर सुमारे 59 वर्षांनी ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेतून कुस्तीत येणाऱ्या नव्या मुलांमध्ये उमेद निर्माण होईल. राष्ट्रीय स्पर्धेतही साताऱ्याला अनेक पदके या मुलांनी आणली आहेत. साताऱ्यासह लगतच्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्हय़ातील मल्लांना स्फूर्ती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.









