प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहर वाहतूक शाखेने सातारा पालिकेच्या सहकार्यातून मंगळवारी सकाळी अचानक येथील जुना मोटर स्टँड आणि खण आळी परिसरात 150 नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली. चार दिवसावर आलेल्या गणेशोत्सव आणि त्यानंतर येणाऱ्या दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणूनच ही मोहीम नगरपालिकेच्या पथकाचा सहकार्याने राबविण्यात आली असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी दिली.
विठ्ठल शेलार पुढे म्हणाले, कोरोनाचा धोका अद्यापही संपलेला नाही. चार दिवसावर आलेला गणेशोत्सव त्यानंतर होणारा दुर्गोत्सव, घटस्थापना पाहता खबरदारीचा उपाययोजना म्हणून सातारा शहर वाहतूक शाखेने नगरपालिकेच्या पथकाच्या मदतीने मंगळवारी सकाळी 11.30 वाजता सातारा शहरातील जुना मोटर स्टँड, आणि खणआळी परिसरात नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली. यावेळी 150 नागरिकांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले असून चाचणी करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाइल नंबर याच्या नोंदी ठेवण्यात आल्या असून संबंधित व्यक्तीच्या मोबाइलवर चाचणीचा अहवाल पाठवण्यात येणार आहे.