● ‘आरे-कारी’ प्रकरणाचा ‘तरुण भारत’कडून भांडाफोड, ● एकाच बाधितांचे दोनदा आयसीएमआर नंबर येतात कसे?● सातारा प्रशासन द्या बघू याचे उत्तर !
दीपक प्रभावळकर / सातारा :
संपूर्ण देश आणि महाराष्ट्राबरोबरच सातारा जिल्हय़ातही कोरोनाची दुसरी लाट आली होतीच. मात्र या लाटेत आकडेवारी अपलोड न केल्यामुळे पॉझिटीव्हीटी कृत्रिमरित्या वाढली अन् जिल्हय़ावर लॉकडाऊन लादला गेला. पॉझिटीव्हीटी वाढण्याच्या कारणांचा ‘तरुण भारत’कडून अव्याहत शोध सुरु आहे. त्यातच सातारा तालुक्यातील ‘आरे-कारी’ प्रकरण हाताशी आले आहे. एका कुटुंबातील दहा रुग्णांची एकदाच (एकदाच) तपासणी करुन दोनदा बाधित असल्याचे रिपोर्ट आलेत. दोन्ही वेळी आयसीएमआरचे नंबर वेगवेगळे आहेत. एकजण तर आयसोलेट राहून पुण्यात नोकरीवर हजर झालाय तरी सातारा प्रशासन त्याला परळी खोऱयात शोधत आहे… नमुना चाचण्यांचे आकडे व पॉझिटीव्हीटी फुगवटय़ाचा शोध घेताना मिळालेले हे हिमनगाचे टोक तर नसेल ना…? म्हणूनच पुराव्यादाखल हे प्रकरण वाचकांना देण्याचा हा प्रयत्न.
कोरोना अपलोड घोटाळा ‘तरुण भारत’ने महाराष्ट्रासमोर आणल्यामुळे प्रशासनातल्या विविध बाबींचा हलगर्जीपणा आता चव्हाटय़ावर आला आहे. बाधितांची माहिती वेळीच अपलोड न केल्यामुळे जिल्हय़ाची पॉझिटीव्हीटी कृत्रिमरित्या फुगली. अशाच प्रकरणांचा शोध घेताना तरुण भारत समोर ‘आरे-कारी’ प्रकरण समोर आले. दि. 27 मे 2021 ला कारी ता. सातारा (परळी खोरे) गावात गवडीतील 4 आणि कारीतील 11 बाधितांची यादी मिळाली. त्याप्रमाणे ग्रामस्तरावरील यंत्रणांनी बाधित शोधायला सुरुवात केली. अर्धा दिवस सरला तरी नावाप्रमाणे रुग्ण सापडेनात. अखेर गावकऱयांच्या चर्चेतून या नावाचे लोक जवळच असलेल्या आरे ता. सातारा या गावचे असल्याची शक्यता वाटली. मग ग्रामस्तरावरच्या यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला. आणि दहा बाधितांचे अरिष्ट आपल्या गावातून दुसऱया गावात ढकलले.
कारीचं अरिष्ट आऱ्यात आलं
कारीत मिळालेल्या यादीत बाधिताचे नाव, वय, लिंग, मोबाईल नंबर, आयसीएमआर नंबर अगदी सविस्तर होते. मात्र या गावात त्या नावाचे लोक नव्हते. आरेत आलेल्या या यादीच्या अरिष्टाप्रमाणे आरे गावात शोधमोहिम सुरु झाली. दिलेल्या यादीप्रमाणे रुग्ण, त्यांचे वय, लिंग, मोबाईल नंबर सगळं तंतोतंत बरोबर होते. सारेच बुचकाळय़ात. अखेर कोरोनाच्या महामारीत प्रत्यक्ष रणांगणावर लढणाऱया आशा स्वयंसेविकेमुळे अधिक माहिती मिळाली.
हे अरिष्ट महिन्यापूर्वी येवून संपलं होतं
कारीत मिळालेल्या यादीप्रमाणे आरे गावात दहा दहा रुग्ण मिळाले मात्र त्यांच्यावरच अरिष्ट महिन्यापूर्वीच संपलं होतं. जाधव भावकीतील हे दहा रुग्ण दि. 3 मे 2021 रोजी बाधित आले होते. आणि त्यांचे आयसोलेशन, क्वॉरंटेशन संपून गेलं होते. कोरोना होवून 24 वा दिवस होता आणि सातारा जिल्हा प्रशासन त्यांना पुन्हा होम आयसोलेट करण्यासाठी धावले होते. ज्या 71 वर्षीय रामचंद्र हणमंत जाधव या वृद्धाने कोरोनावर विजय मिळवला होता त्यावर फुले उधळून स्वागत करण्याऐवजी प्रशासन नवी यादी घेवून क्वारंटाईनसाठी धावली होती.
ग्रामीण भागातल्या कोरोना रुग्णांचा असाही छळ
आरे गावातील जाधव कुटुंबियांच्यात दि. 3 मे ला कल्याणी, अर्चना, तेजस हे तिघे बाधित झाल्याचा रिपोर्ट आला होता. तर निलम, रामचंद्र हे त्या आधी 15 दिवस बाधित होते. आणि त्यांचे आयसोलेशनही संपले होते. घरातील लोक बाधित आल्यामुळे उर्वरित कुटुंबियांनी म्हणजेच प्रमिला, शंकर, ऋषिकेश, आशानी आरटीपीसीआर करुन त्यांचाही रिपोर्ट दि. 7 मे 2021 रोजी पॉझिटीव्ह आले होते.
एकाच भावकीतील दहा जण पॉझिटीव्ह आल्याने साऱया भावकीने महामारीचे सर्व नियम तंतोतंत पाळले. एकमेकांना आधार दिला. 14 दिवसांच्या या तणावपूर्ण काळात आशा रामचंद्र जाधव वय 69 यांना जास्त लक्षणे दिसून आली. वैद्यकीय सल्ल्यानुसार दहा रुग्णांपैकी केवळ यांचाच साताऱयात सीटी चेस्ट करण्यात आला. मात्र तो ही जास्त नसल्याने त्यांनी मोठय़ा धैर्याने होम आयसोलेट रहात विजय मिळवला.
कुठे व केंव्हा झाल्या होत्या टेस्ट
परळी खोऱयात हॉटस्पॉट तयार झाल्याने यंत्रणांची धावपळ सुरु होती. त्यामुळे ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दरे (ता. सातारा) येथे मेडिकल चेकअप कॅम्प लावण्यात आला होता. यात जाधव कुटुंबियांतील तिघांचे रॅट रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने याच कॅम्पमध्ये दि. 1 मे रोजी उर्वरित कुटुंबियांनी आरटीपीसीआर केली होती. दरम्यान, याच आरोग्य यंत्रणेकडून दुबार याद्या मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन याद्यातील आयसीएमआर नंबर तपासले तर त्या नंबरवरुन त्या त्याच लोकांची नावे दिसत आहेत. पण खरा नंबर कोणता? हा प्रश्न विचारला तर प्रशासनही हतबल असल्याचे सांगत आहेत.
पुण्यात नोकरीवर हजर झाला तरी सातारा प्रशासन बाधिताला गावात शोधतेय
आरे गावातील जाधव कुटुंबियांपैकी तेजस शंकर जाधव (वय 23) हा उमदा तरुण बाधित झाला. साऱया कुटुंबियांना आधार देण्याबरोबर त्यानेही कोरोनावर मात केली. तेजस पुण्यात नोकरीला आहे. आता हजर व्हायचे म्हणून त्याने एकटय़ानेच ऍन्टिबॉडी टेस्ट केली आणि सारे नियम पाळून तो नोकरीवर हजर ही झाला आहे. मात्र कारी गावात आलेल्या यादीप्रमाणे सातारा जिल्हा प्रशासनाचे लोक त्याला आयसोलेट करण्यासाठी सातारा जिल्हय़ात शोधत आहेत.
अशीच पॉझिटीव्हीटी वाढत चाललेय
‘आरे-कारी’ प्रकरणातील या दहा रुग्णांनी केवळ एकदाच टेस्ट करुन दोन वेळा पॉझिटीव्ह रिपोर्ट आले आहेत. त्यामुळे गावची पॉझिटीव्हीटी 70 टक्क्यांवर जाण्याबरोबरच तालुक्याच्या आणि जिल्हय़ाच्या पॉझिटीव्हीटीत असाच हातभार लागला आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला परळी खोऱयातील हाच भाग मोठा हॉटस्पॉट ठरला होता. त्याचीही कारणे शोधायला हवीत.
हे कोडं कदाचित आयसीएमआरला सुटेल का?
1) नाव 2) पहिला आयसीएमआर नं. 3) दुसरा आयसीएमआर नं.( या प्रमाणे वाचावे )
कल्याणी शंकर जाधव 27,56,07,07,8 30,85,59,71,4
प्रमिला सतीश जाधव 27,56,07,07,3 30,85,64,57,5
अर्चना शंकर जाधव 27,56,07,06,5 30,85,74,01,0
तेजस शंकर जाधव 27,56,08,53,4 30,85,78,51,0
अनिकेत आनंदा किर्ते27,56,08,05,0 30,85,91,62,5
शंकर दत्तू जाधव 28,28,51,03,3 30,85,96,79,1
ऋषिकेश सतीश जाधव28,28,51,02,4 30,86,02,08,5
नीलम शैलेश जाधव (रॅट टेस्ट)30,85,38,28,6
आशा रामचंद्र जाधव (रॅट टेस्ट)30,85,48,49,8 रामचंद्र हणमंत जाधव (रॅट टेस्ट)30,85,53,66,9
-दीपक प्रभावळकर 9325403232, 9527403232