प्रतिनिधी / सातारा
सद्या पश्चिम महाराष्ट्रात खासकरून साताऱ्यात कोरोनाचा विळखा आणखी जास्त घट्ट अवळताना दिसत असून रोज आठशे ते हजार रुग्ण सापडत आहे. अशा या गंभीर परिस्थितीमध्ये गेले 6 महिने आपले जीव धोक्यात घालून पत्रकार प्रशासनाबरोबर रस्त्यावर आहेत. यात काही पत्रकारांना आपले प्राण ही गमवावे लागले आहेत.
अशा या परिस्थितीत जिथे हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे ही अशक्य प्राय झाले आहे तिथे साताऱ्यात सातारा जिल्हा पत्रकार संघ मार्फत पत्रकारांसाठी हॉटेल ‘निवांत’ येथे स्वतंत्र असे 16 बेडचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले असून बहुदा हे महाराष्ट्रातील पहिलेच सेंटर असून काल सातारचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन झाले. या सेंटरमध्ये 16 बेडची सोय असून दोन ऑक्सिजन मशीन ही ठेवण्यात आल्या आहेत. ज्या पॉझिटिव्ह पत्रकारांकडे स्वतंत्र आयसोलेशनची सोय नाही त्यांना याचा लाभ होणार असून या ठिकाणी एक डॉक्टर व दोन परिचारिका ही असणार आहेत.
या प्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी, दीपक प्रभावळकर,जिल्हा माहिती अधिकारी, युवराज पाटील, सुजित अंबेकर, चंद्रसेन जाधव, ओंकार कदम,शरद काटकर, राहुल तपासे, तुषार तपासे, चंद्रकांत देवरुखकर,तबरेज बागवान प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.









