अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 29 मे 2021, सकाळी 11.15
●पॉझिटीव्हीटी रेट स्थिर ●नव्याने आढळून आले 2257 बाधित ●सात दिवसांपासून होताहेत दुप्पट तपासण्या ●सातारा तालुका रेडझोनमध्येच
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात पॉझिटीव्हीटी रेट आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ट्रेसिंग, टेस्ट आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर गेल्या सात दिवसांपासून भर दिला आहे. जिल्ह्यात दररोज 11 ते 12 हजार स्वाबची तपासणी केली जात आहे. तपासण्या दुप्पट झाल्या असल्या तरीही पॉझिटीव्हीटी रेट हा तेवढाच आहे. म्हणजेच 19.17 एवढाच राहिला आहे. दरम्यान, सातारा तालुका हा बाधित आणि मृत्यूंमध्ये जिह्यात टॉपलाच आहे. कोरोना संसर्गाचा वेग सातारा तालुक्यात हा वेगानेच होताना दिसत आहे. दरम्यान, साताऱ्यात आकड्यांचा घोळ सुरुच आहे. आयसीएमआर आणि जिल्हास्तरीय आकडयांमध्ये त्रुटी आहेत.
जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढणारा स्प्रेड थांबवण्यासाठी ट्रेसींग, टेस्ट आणि ट्रीटमेंट या फंडय़ावर भर दिला गेला आहे. गावागावात जे जुने आजार आहेत. तसेच ज्यांना संशय आहे अशांचा शोध घेवून त्यांची कोरोना तपासणी करण्यामध्ये सर्वच गावांमध्ये गेल्या सात दिवसांपासून सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली गेली आहे. त्या जबाबदारीनुसार गाव पातळीपासून ते शहरातील गल्लीबोळापर्यंत वेगाने काम सुरु आहे.
त्यामुळे गेल्या सात दिवसांपूर्वी म्हणजे दि.23 च्या अगोदर दररोज जिल्ह्यात सहा ते सात हजार स्वाब घेतले जात होते. परंतु त्यानंतर दुप्पट स्वाब घेण्यास प्रारंभ केला आहे. तेव्हापासून पॉझिटीव्ही रेटही 18 ते 19 च्या दरम्यानच आहे. बाधित आढळून येणाऱयांची संख्या मात्र दोन हजाराच्या पट्टीत आहे. सुमारे दररोज 11 ते 12 हजार स्वाब तपासणी केले जात आहेत. त्यामध्ये बाहेर फिरणाऱयांचे स्वाब घेतले जात असल्याने त्यातही पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे पॉझिटीव्हीटी रेट हा स्थिरावला गेला आहे. दि.28रोजी डीएच सातारामध्ये 2244 जणांचे स्वाब घेतले त्यापैकी 470 जण पॉझिटीव्ह आले. केआयएमएसमध्ये 114 जणांचे स्वाब तपासले त्यात 35 जण बाधित आढळून आले. खाजगीमध्ये 1013 जणांचे स्वाब तपासले त्यात 158 जण बाधित आले.
आरटीपीसीआरमध्ये 3 हजार 371 जणांचे स्वाब तपासले त्यात 663 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. आरएटीमध्ये 7हजार932 जणांचे स्वाब घेतले होते. त्यापैकी 1594 बाधित आले, असे एकूण 11 हजार 303 जणांचे स्वाब घेण्यात आले होते. त्यापैकी 2257 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. एकूण जिह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 19.97 एवढा आला आहे.
आकड्यांचा घोळ सुरुच
जिल्हा प्रशासनाकडून वारंवार त्रुटी राहत आहेत. मागच्या पंधरा दिवसांपुर्वी यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यामुळे कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटीव्हच येत होता. ती बाब तब्बल तीन दिवस झाकली मुठ तशीच राहिली होती. आताही जिल्हा प्रशासन आणि आयसीएमआर यांच्यामध्ये येणाऱया आकडय़ामध्ये मेळ लागत नाही. मग नक्की कोणाच गणित चुकत आहे असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
गावोगावी उभे राहू लागले संस्थात्मक विलगिकरण कक्ष
सातारा जिल्हा रेड झोनमध्ये गेला असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिह्यातील होम आयसोलेशनमधील उपचार बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता गावागावात संस्थात्मक विलिनीकरण कक्ष गावच्या एकीमुळे उभे होताना दिसत आहेत. तहसीलदार स्वतः गावागावांना भेटी देत आहेत. परिस्थितीचा आढावा घेत आहेत. एकूणच जिह्यातील 1496 गावातील ग्रामस्थही प्रशासनास सहकार्य करु लागले आहेत.
शनिवारपर्यंत नमुने…761836, बाधित…162511, घरी सोडलेले…135043, मृत्यू….3592, उपचारार्थ…24076









