प्रतिनिधी / नागठाणे:
अवैध दारूविक्रीबरोबरच केमिकलमिश्रित ताडी विक्रीने परिसरात जम बसवण्याचा प्रयत्न सुरू केला असून निसराळे फाटा (ता
सातारा) येथील अश्याच अवैध केमिकलमिश्रित ताडीविक्री अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून सुमारे ३००० रुपये किंमतीची ताडी जप्त केली आहे. याप्रकरणी रामचंद्र किसन सुर्यवंशी (वय.३१,रा.जांभगाव, ता.सातारा, मूळ रा.घावन, ता.पाटण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
निसराळेफाटा येथे अवैधरित्या ताडी विक्री केली जात असल्याची माहिती सपोनि डॉ.सागर वाघ यांना बुधवारी समजली. यावेळी त्यांच्यासह सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल, हवालदार विजय साळुंखे, विशाल जाधव व होमगार्ड लोहार यांनी तेथे छापण टाकला. यावेळी चौंडेश्वरी ऍग्रो सर्व्हिस दुकानाच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये रामचंद्र सुर्यवंशी हा ताडी विक्री करताना सापडला. त्यांच्याजवळून सुमारे ३००० रुपये किंमतीच्या ६० ताडीने भरलेल्या पिशव्या जप्त केल्या. ही अवैध ताडी विक्रीसाठी नेमकी कोठून आणली जाते? याचा मुख्य उत्पादक सुत्रधाराच्या मुसक्या बोरगाव पोलिसांनी आवळाव्यात अशी चर्चा परिसरात सुरू आहे.