वहागाव / वार्ताहर :
आशियाई महामार्गावर गोटे (तालुका कराड) येथे बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार झालेल्या पावसामुळे गोटे येथील महामार्गालगत सेवा रस्त्यावर असणारा ओढा तुंबल्याने ही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गोटे गावच्या उत्तर बाजूकडील शेतातून येणारे पाणी या छोट्या ओढ्यातून महामार्गाच्या पलीकडे कृष्णा नदीच्या दिशेने जाते. आजवर अनेक पावसाळे झाले. यावेळी फक्त सेवा रस्त्यावर पूरपरिस्थिती निर्माण होत होती. मात्र यावेळी महामार्गावर ही पूरस्थिती निर्माण झाली. घटनास्थळी कराड शहराचे वाहतूक पोलीस, महामार्ग पेट्रोलियमचे कर्मचारी दाखल होते. यावेळी कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक गोटे येथून ब्रिजवरून वळवून विरुद्ध दिशेने सुरळीत करण्यात आली. महामार्गावर गोटेनजीक या पुलाची उंची खूप कमी आहे. पुलाखालून जाणारे पाणी कचरा तुंबल्याने पाण्याचा प्रवाह महामार्गाच्या दिशेने आला. याठिकाणी सर्व शेतांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. महामार्गालगत पावसाळ्याच्या अगोदर असणारे पूल , ओढे, स्वच्छ ठेवले पाहिजेत अन्यथा अशी परिस्थिती कमी उंचीच्या पुलाजवळ महामार्गावर निर्माण होऊ शकते. 2019 ला कोल्हापूरला पंचगंगेला पूर आला होता. यावेळी महामार्गावरून पाणी वाहत होते. या पूरस्थिती दरम्यान सहा दिवस महामार्ग वरील वाहतूक ठप्प होती. तीच पुनरावृत्ती महामार्गावरती पाणी येऊन कराडला झाली आहे.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास पाऊस सुरू होता. यावेळी महामार्गावर पूरस्थिती निर्माण झाली. कोल्हापूरहून पुण्याला जाणारी कार या ठिकाणी आल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यावेळी कार चालकाने गाडी पाण्यात सोडून दिली आणि स्वतः चा जीव वाचवला. ही कार थोड्या वेळातच पूर्ण बुडाली असून या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी प्रशासन अलर्ट असून कार ,टू व्हीलर यांना पाण्याच्या दिशेने न जाण्याच्या सूचना देत आहेत.









