प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्याच्या सोनगाव कचरा डेपोत मैल्यापासून खत निर्मिती सुरु करण्यात आली आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्पही सुरु आहे. सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन पुन्हा वापर करण्याचा प्रकल्प काही दिवसात कार्यान्वित करण्यात येणार आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यामुळे प्रकल्प सुरु होत असून, सोनगाव कचरा डेपोचे चित्र बदलत आहे.
शहरात दररोज तयार होणारा सहा टन कचरा हा घंटागाडीमार्फत गोळा करून सोनगाव कचरा डेपोत टाकण्यात येतो. कचरा डेपोबाबत अनेकदा प्रश्न निर्माण झाले होते. परंतु मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सोनगाव कचरा डेपोत कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. त्या प्रकल्पांना आता मूर्त रुप येवू लागले आहे. मैल्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. त्या प्रकल्पाच्या माध्यमातून खत निर्मिती सुरु करण्यात आलेली आहे. दोन प्रकल्प मैल्यापासून खतनिर्मितीचे आहेत. तर ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा एक प्रकल्प आणि सुक्या कचऱ्यापासून प्रक्रिया करण्याचा एक प्रकल्प असे चार प्रकल्प सध्या उभे करण्यात आलेले आहेत. या प्रकल्पामुळे सोनगाव कचरा डेपोमध्ये येत्या काही दिवसांमध्ये जाणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करुनच कचऱ्याची पूरेपुर विल्हेवाट लावण्यात येणार आहे. ओल्या कचऱ्याचे खत तर सुक्या कचऱ्याचा पूनर्वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने सातारा पालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
सोनगाव कचरा डेपो बनणार स्वच्छता पॉईंट
सातारा शहरातील कचरा सोनगाव कचरा डेपोत टाकण्यात येतो. त्या कचरा डेपोच्या परिसरातही अस्वच्छतेमुळे त्या परिसरातील ग्रामस्थ सतत आंदोलन करत असतात. पंरतु आता सोनगाव कचरा डेपोत कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे कचरा डेपो येत्या काही दिवसात स्वच्छता पॉईंट बनणार आहे.