प्रतिनिधी / सातारा:
सातारा शहर ज्या किल्याच्या पायथ्याशी वसले आहे तो किल्ला अजिंक्यतारा आज दुपारी अज्ञातांनी लावलेल्या वणव्यात होरपळत होता. तब्बल दोन तासात शेकडो हेक्टर क्षेत्रातील झाडे जळून गेली. पालिकेच्या अग्निशामक दलाच्या बंबांने लागलेला वणवा आटोक्यात आणला. या वणव्यात सुंदरबनातील साप, पक्षांची घरटी जळून खाक झाली. साग, शिवर, आंबा, ऐन, पिंपळ, करंद, जांभूळ, तोरण, करंज या झाडांसह घाणेरी, रामेदा, आळवी, शिकेकाई, कटक अशी आयुर्वेदीक झाडेही जळून गेली. ही आग सकाळी साडे अकरा वाजता माची पेठेच्या परिसरातून पेटत वार्याच्या वेगाने वर कडय़ाच्या मुख्य दरवाजाच्या बाजूने गेली. आग लागताच आगीमध्ये पक्षी घरटी सोडून उडून जावू लागले. तर घरटय़ातील पक्षांची अंडी, पिल्ले जळून गेले. या आगीची माहिती लागताच उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी लगेच अग्निशामक दलास सुचना करताच पालिकेचे अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहचले. सुरुवातीला एका बंबाने वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत शेकडो एकर भागातील वृक्षसंपदा जळून खाक झाली होती.








