दापोली पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसीं कारवाई
वार्ताहर / टाळसुरे
सातारा जिह्यात मित्राचे अपहरण करून एका शेतात त्याचा काटा काढल्यानंतर दापोलीला पळालेल्या 2 आरोपींना सातारा पोलिसांनी दापोली पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले. घटनेनंतर 30 तासात आरोपींना अटक केल्याने सातारा पोलीस पथकाचे व दापोली पोलिसांचे कौतुक होत आहे.
खानापूर गावातील अभिषेक रमेश जाधव (20) याला त्याचेच मित्र रहीम मुलाणी आणि प्रज्वल जाधव यांनी 2 फेब्रुवारी रोजी या दुचाकीवर जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले व परखंदी गावाच्या परिसरात निर्जनस्थळी एका शेतात नेले. तेथे धारदार हत्याराने त्याच्या पाठीवर सपासप वार करुन त्याची हत्या केली व वरील आरोपींनी दापोलीकडे पलायन केले. या गुह्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली होती.
आरोपींना पकडण्यासाठी सातारा पोलिसांनी आपलं सारं कौशल्य पणाला लावलं आणि थेट दापोली गाठली. दापोली पोलिसांच्या मदतीने त्यांनी रात्री सर्व परिसर पिंजून काढला. शिवाय संशयास्पद वाटणाऱया दोन घरांमध्ये जाऊन झडतीदेखील घेतली. मात्र सकाळपर्यंत या आरोपींचा काही पत्ता लागत नव्हता. अखेर सकाळी गिम्हवणे चेक पोस्टजवळ त्या आरोपींची गाडी समोरून येताना आढळून आली. पोलिसांच्या दुसऱया गाडीने ही गाडी ओळखली व आरोपींवर झडप घालून दापोली पोलिसांनी त्यांना जेरबंद केले व सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले.
30 तासांत खानापूरच्या अभिषेकच्या खुनातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे. रत्नागिरी जिह्यातील दापोली तालुक्यातील हर्णेबंदर येथे दोन दिवसांपासून भुईंज पोलीस ठाण्याचे सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, मोहिते आणि एलसीबीचे सचिन ससाणे, धिरज महाडीक हे सर्व वेषांतर करून होते. सापळा लावून बसले होते. अखेर शनिवारी सकाळी आरोपी रहीम मुलाणी व प्रज्वल जाधव यांच्यावर झडप घालून त्यांच्या मुसक्या आवळण्यात अखेर यश आले.
भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा तपास जलदगतीने करण्यासाठी वरील पोलीस पथक तयार केले होते. तपास कामात जलद यश प्राप्त केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, वाईच्या डीवायएसपी शीतल जानवे-खराडे, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आशीष कांबळे, पोलीस निरीक्षक स्नेहल सोमदे यांचे कौतुक होत आहे. त्यांना दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे, दीपक गोरे, विकास पवार, राजेंद्र नलावडे, रुपेश दिंडे, सूरज मोरे आदी दापोली पोलिसांचे सहकार्य लाभले.









