प्रतिनिधी/ सातारा
शहरात दोन पोलीस ठाणे आहेत तरी सुध्दा अवैध व्यवसाय खुलेआमपणे सुरु आहेत. ऐतिहासिक ठिकाणे मद्यपी, गर्दूले दिवसा आणि रात्री आपले अड्डे बनवत आहेत. राजवाडय़ाच्या परिसरात तर रात्रीचा मद्यपींचा ओपन बार सुरु असतो. नुकताच काही दिवसांपूर्वी ड्रंक ऍण्ड ड्राईव्हचा थरार सातारकरांनी अनुभवला. सातारा शहर आणि शाहुपूरी पोलिसांकडून ठोस कार्यवाही होत नाही. राजवाडा परिसरात खुलेआम दारु पिणाऱया दोन जणांना पुण्यातून आलेल्या शिवभक्तांनी रोखत हाकलून लावले. दरम्यान, मटक्याचे अड्डे तर खुलेआमपणे सुरु आहेत. पोलिसांना आम्ही हप्ते देतो आमचे पोलीस काहीच करु शकत नाहीत, अशा आर्विभावात हे मटका चालक सध्या आहेत.
गेल्या तीन दिवसांपूर्वी सातारा शहरात ड्रंक ऍण्ड ड्राईव्हचा थरार अनुभवायला मिळाला अन् 31 डिसेंबर जवळ आल्याची जाणीव करुन दिली. परंतु अलिकडच्या काही दिवसापासून सातारा शहरातल्या राजवाडा परिसर असेल चारभिंती परिसर, जुना दवाखाना परिसरात ओपन बार राजरोसपणे सुरु असतो. त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढून ऐतिहासिक ठिकाणचे पवित्रही जपले जात नाही. मंगळवारी सायंकाळी राजवाडा चौपाटीलगतच जुन्या राजवाडय़ाच्या पुढील भागात दोन मद्यपींचा दारु पिण्याचा कार्यक्रम सुरु असल्याची बाब शिवभक्तांच्या निदर्शनास येताच त्यांनी चांगले फैलावर घेतले. पावित्र्य राखा अशा शब्दात सुनावले. त्या दोघांनी दारु पिणे बंद करुन माफी मागून निघून गेले. परंतु साताऱयात पोलिसांकडून उघडय़ावर दारु पिणाऱयावर कारवाई केली जात नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली.
मटका खुलेआमपणे सुरु
सातारा शहर व शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी मटक्याचा खुलेआमपणे व्यवसाय सुरु आहे. बातमी पेपरमध्ये आली की तेवढय़ापुरती कारवाई होते. दुसऱया दिवशी मटका अडयावर तुफान गर्दी दिसते. पोलिसांना हप्ते सुरु असतात असे खुद्द काही मटका चालक सांगतात. त्यामुळे सातारा पोलीस नेमके मटका अडय़ांना अभय कशासाठी देतात असाही प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांना पडू लागला आहे.









