प्रतिनिधी/ सातारा
आरं या नबाब मलिकाचे करायचं काय खाली मुंडी वर पाय, द्रेशद्रोह्यांशी संबंध ठेवणाऱया नबाब मलिकांचा निषेध असो, भाजपाचा विजय असो, नबाब मलिक मुर्दाबाद, हाय हाय नबाब मलिक हाय हाय, नबाब मलिक राजीनामा द्या, अशा जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्यावतीने जोरदारपणे मंत्री नबाब मलिक यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. कार्यालयात निवेदन देण्यासाठी शिष्ट मंडळ जात होते तेव्हहा त्यांना पोलिसांनी रोखण्यात आल्याने पोलीस अन् कार्यकर्त्यांच्यामध्ये जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली.
राज्यभर पुकारण्यात आलेल्या भाजपाच्या आंदोलनामुळे सातारा पोलीस यंत्रणा अलर्ट झाली होती. त्यांनी भाजपाच्या मोर्चाला परवानगीच नाकारली. त्यामुळे जिह्याच्या कानाकोपऱयातून आलेले भाजपाचे मोजकेच कार्यकर्ते आक्रमक झाले. बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासह पोलीस मुख्यालय, शाहुपूरी, तालुका पोलीस ठाणे, बोरगाव या पोलीस ठाण्यातील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मोर्चाला मनाई केल्याची बाब निदर्शनास येताच कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमत आंदोलन केले. यामध्ये जोरदारपणे घोषणा देत कार्यकर्त्यांनी मंत्री नबाब यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ास जोडे मारत निषेध नोंदवला. महिला कार्यकर्त्यांनी जोरदारपणे हा निषेध व्यक्त करत आपला राग नबाब मलिक यांच्या प्रतिमेवर काढला. निवेदन देण्याकरता शिष्टमंडळ आतमध्ये जात असताना पोलिसांनी आडकाठी करताच कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात शाब्दीक चकमक झाली.
या आंदोलनात भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, विट्ठल बलशेठवार, शिवाजीराव शिंदे, सचिन घाटगे, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेविका प्राची शहाणे, प्रवीण शहाणे, राजेंद्र इंगळे, श्रीहरी गोळे, संतोष जाधव, एकनाथ बागडी, महेश जाधव, बजरंग, महेश जाधव, यशवंतराव लेले, मनिषा पांडे, प्रिया नाईक, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, विक्रम बोराटे आदी सहभागी झाले होते.
आंदोलनाची गर्दी पाहून भाजपच्या महिला पदाधिकाऱयांनी फिरवली पाठ
ऐवीतेवी गर्दीचे कार्यक्रम अरेंज करणाऱया व नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय लागलेल्या भाजपातील काही महिला पदाधिकारी नेमक्या रस्त्यावरच्या आंदोलनाच्यावेळी गायब झाल्याचे चित्र दिसत होते. काहींचे तर पतीराज इतर पक्षात असून उघडपणे भाजपाच्या विरोधात गरळ ओकत असतात. अशा पदाधिकारीही या आंदोलनात कुठे दिसत नव्हत्या. दोनच दिवसांपूर्वी भाजपाच्या आढावा बैठकीत जो सक्रीय असेल त्यालाच निवडणूकीमध्ये तिकीट देण्यात येईल, अशा सुचना दिल्या होत्या.
दरम्यान, काम कमी अन् प्रसिद्धी जास्त अशा भाजपाच्या महिला पदाधिकारी या आंदोलनात फिरकल्याही नव्हत्या. परंतु पक्षासाठी निष्ठा असणाऱया महिला कार्यकर्त्या दिसत होत्या. त्यांनी स्वतःच्या पायातली चप्पल काढून मंत्री नबाब मलिक यांच्या प्रतिकात्मक फोटोवर हाणल्याचा फायदा त्यांना होणार की चमको पदाधिकारी महिलांनाच पुन्हा भाजपा पावणार याचीही चर्चा यावेळी सुरु होती.









