साडे चार हजार रुपये जप्त : चौघांवर गुन्हे दाखल
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहर व परिसरात मटका, जुगार अवैध व्यवसायावर पोलिसांनी कारवायांचा धडाका सुरु केला आहे. दि. 20 रोजी सातारा शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी 4 हजार 442 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील नकाशापुरा चौक, तेली खड्डा येथील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अफरोज वली खान (रा. खेड ग्रामपंचायती जवळ, खेड, ता. सातारा) आणि यासीन शेख (रा. गुरुवार परज, सातारा) हे दोघे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 1300 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
अन्य एका घटनेत कोडोली, ता. सातारा येथील विराज बेकरीच्या पाठीमागे टपरीच्या आडोशाला अशोक रामचंद्र काळे (रा. धनगरवाडी, ता. सातारा), समीर कच्छी (रा. सैदापूर, ता. सातारा) हे दोघे जुगार घेताना आढळून आले त्यांच्याकडून 1142 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या चौघांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलीस दलाकडून कारवाया होत असल्या तरी त्याच परिसरात, त्याच ठिकाणी पुन्हा हेच संशयित मटका व्यवसाय चालवत असून अवैध व्यवसायाचे हे चक्र काही थांबत नाही.









