7 जणांवर कारवाई : तेच अड्डे, त्याच कारवाया : मटका नेमका कधी बंद होणार
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहर पोलीस व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी सातारा शहर परिसरातील तीन ठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्डय़ांवर छापे टाकत सात जणांवर कारवाई केली. या कारवाईत 2 हजार 134 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आल्या असून मटकाकिंग सलीम कच्छी, यासिन शेख यांच्यासह त्यांच्या पटंरवर कारवाई झाली असली तरी यांचे मटका व्यवसाय कायमस्वरुपी बंद होत नाहीत. कारवाई व पुन्हा अड्डे सुरु असा पाठशिवणीचा खेळ साताऱयात सुरु आहे.
सातारा शहर परिसरात अवैध मटका फोफावला आहे. बंद टपऱया, आडोशाने हा व्यवसाय सुरु असतो त्यातील पंटर नेहमी बदलतात मात्र, मटका अड्डा चालवणारे नेहमीचेच यशस्वी किंग या गुंतलेले असतात. त्यांच्यावर शेकडो वेळा कारवाई करुन मटका शहरात सुरुच असतो.
शाहूपुरी पोलिसांनी समर्थ मंदिर चौकात नवगृह मंदिरालगत असलेल्या पानटपरीतील मटका व्यवसायावर छापा टाकत अमित विष्णू नलवडे (वय 34, रा. मंगळवार पेठ, सातारा), शुभम महेंद्र गंगावणे (वय 24, करंडी, ता. सातारा) व यासिन इक्बाल शेख (रा. शनिवार पेठ, सातारा) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या ताब्यातील 479 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
तर दुसऱया कारवाईत जुना मोटार स्टँड परिसरातील व्यापारी संकुलाच्या पार्किंगमध्ये सुरु असलेल्या मटका व्यवसायावर छापा टाकत सादिय आयुब सय्यद (वय 35, रा. गुरुवार परज, सातारा) व समीर सलीम कच्छी (रा. यश ढाब्याच्या मागे, मोळाचा ओढा, सातारा) याच्यावर कारवाई केली. यावेळी 1 हजार 55 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी कोडोली येथील कमानीशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमधील मटका अड्डय़ावर छापा टाकत गणेश गोरखनाथ निकम (वय 38, रा. जांब बुदूक, ता. कोरेगाव) व सलीम कच्छी, (रा. मोळाचा ओढा, सातारा) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या ताब्यातील रोख 600 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वारंवार कारवाया होवून देखील साताऱयातील मटका व्यवसाय बंद होत नसल्याने त्यावर ठोस व कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.









