साडे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त : विविध गुन्हय़ातील आरोपी, संशयितांवर कारवाई
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिह्यामध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आणि सणांच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 लाख 26 हजार 290 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सध्या सातारा जिह्यामध्ये आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका या अनुषंगाने पोलीस उपविभागीय अधिकारी आंचल दलाल यांच्या अधिपत्याखाली सातारा शहर व शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये विविध गुह्यातील गुन्हेगार, संशयित वाहने, इसम, हॉटेल, लॉज, धाबे यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलीस उपविभागीय अधिकारी आंचल दलाल यांच्या अधिपत्याखाली सातारा शहर व शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आकाशवाणी, नामदेववाडी मंगळवारपेठ झोपडपट्टी, बोगदा परिसर, इंदिरानगर, लक्ष्मी टेकडी, अजंठा झोपडपट्टी, रविवारपेठ, माची पेठ, केसरकर पेठ आदी ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन कारवाई राबवून 4 हिस्ट्रीशिटर, 14 माहितगार गुन्हेगार, 4 पाहिजे असले आरोपी, 4 हद्दपार इसम, दोन गुह्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे दोघे इसम, 19 हॉटेल, लॉज, धाबे, 31 संशयित वाहने, 4 संशयित इसम, 13 दुचाकी वाहने, 4 समन्स अशी कारवाई करण्यात आली.
या कोम्वींग ऑपरेशन कारवाई दरम्यान लिंब, ता. जि. सातारा याठिकाणी टाटा सुमो वाहनातून अवैध दारु वाहतुक होत असल्याची माहिती मिळताच डिवायएसपी आंचल दलाल तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून अवैध दारु, साधने व मालमत्ता असा एकूण 5 लाख 26 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अमोल प्रकाश अहिरेकर (वय 33) व मौला शेख (वय 31), दोन्ही रा. वाठार स्टेशन यांना अटक करण्यात आली.
या कॉम्बिंग ऑपरेशन कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी आंचल दलाल तसेच चार पोलीस अधिकारी, 45 पोलीस अंमलदार, पोलीस मुख्यालयाकडील क्युआरटीचे 15, आरसीपीचे 10 पोलीस अंमलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील 1 पोलीस अधिकारी व 4 पोलीस अंमलदार असे एकूण 6 पोलीस अधिकारी व 74 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.









